दलाल गौतम बोराचे रिव्हॉल्वर काडतुसांसह पोलिसांकडून जमा

File Photo

नगर – अधिकाऱ्यांना शासकीय इमारतीच्या आवारात मारहाण करणे, धमकावणे त्रास देणारा दलाल गौतम बोरा याचे रिव्हॉल्वर आणि त्याचबरोबर दहा काडतूस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई गुरूवारी सायंकाळी केली. अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी गौतम बोरा याचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश काढला होता. पोलिसांना या आदेशावर तत्काळ कारवाईची सूचना होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे.

नागापूरचे मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांना गौतम बोरा याने नगर तहसील कार्यालयाच्या आवारात मारहाण करत धमकी दिली होती. मंडलाधिकारी आव्हाड यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला होती. गौतम बोरा याला पोलिसांकडून अटकेची कारवाई होत नसल्याने महसूल अधिकाऱ्यांनी रोष व्यक्त करण्यास सुरूवात केली होती. शासकीय अधिकाऱ्यांना धमकविणाऱ्याला अटकेची मागणी करण्यासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत पोलिसांच्या बोटचेपी भूमिकेचा निषेध व्यक्त केला होता. या दरम्यान, गौतम बोरा याने न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला.

मंडलाधिकारी श्रीनिवार आव्हाड यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पत्र देत गौतम बोरा याच्याकडून मिळत असलेल्या धमक्‍यांमुळे मानसिक मनोबळ खचल्याचे सांगितले होते. ऍड. अभिजीत पुप्पाल यांनीही 1 ऑक्‍टोबरला निवेदन देत गौतम बोरा याने बेकायदेशीर सावकारीतून शेतकऱ्यांच्या लाटलेल्या जमिनींकडे लक्ष वेधले होते. अपर जिल्हादंडाधिकारी प्रशांत पाटील यांनी या तक्रारींची आणि गौतम बोरावर दाखल झालेल्या गुन्ह्याची दखल घेत त्याच्याकडील शस्त्र परवाना रद्द करण्याचा आदेश काढला. या आदेशावर कोतवाली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी तत्काळ कारवाई करत रिव्हॉल्वर आणि दहा काडतुसे त्याच्याकडून ताब्यात घेतली आहे.

अटकपूर्व जामिनावर आज फेरसुनावणी

मंडलाधिकारी श्रीनिवास आव्हाड यांना केलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात गौतम बोरा याने अटकपूर्व जामीन घेतला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी त्यावर न्यायालयात धाव घेऊन अर्ज दाखल केला आहे. महसूल अधिकाऱ्यांनी त्यासाठी खासगी वकिलांमार्फत न्यायालयात बाजू मांडत आहे. गौतम बोरा याच्या अटकपूर्व जामिनावर उद्या शनिवारी फेरसुनावणी होणार आहे. याकडे आता लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)