इच्छाशक्‍तीअभावी रखडले महापालिकेचे नाट्यगृह

निधी उपलब्ध होवून कामाची प्रतीक्षा : नगरचे रंगकर्मी आता मागणी करून थकले

राजकीय पक्षांना विसर

महापालिकेची चौथी निवडणूक सध्या सुरू आहे. नगर विकासाची भरभरून आश्वासने सत्ता उपभोगलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांकडून दिली जात आहेत. पण दुर्दैवाने यापैकी कोणीही सावेडी नाट्यगृहाच्या कामास चालना देण्याची ग्वाही निवडणूक आश्वासन अजेंड्यांवर अजून तरी दिलेली नाही. सर्वच राजकीय पक्षांना नाट्यगृहाचा विसर पडला आहे. या पार्श्वभूमीवर जुन्या महापालिकेच्या जळून खाक झालेल्या कौन्सिल हॉलची पुर्नउभारणी व सर्जेपुरातील मोडकळीस आलेल्या रंगभवनची पुनर्निमिती मनपातील राजकारणी अजून करू शकले नसल्याने त्यांच्याकडून सावेडी नाट्यगृहासाठीही मनापासून साथ मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचा नगरकरांकडून व्यक्त होणारा दावा दुर्दैवाचा ठरू लागला आहे.

नगर – गेल्या अनेक वर्षांपासून नगरच्या सांस्कृतिक वैभवात भरत पडणाऱ्या नाट्यगृहाचा विषय विविध कारणांमुळे रखडला आहे. सर्जेपुरा येथील रंगभवन व सावेडी येथील नाट्यगृह हे दोन्ही विषय मार्गी लागण्यासाठी नगरच्या रंगकर्मीनी सातत्याने पाठपुरावा केला. परंतू त्यात त्यांना यश आले नाही. सावेडी नाट्यगृहासाठी निधी मंजूर झाला. पैसे देखील आले परंतू कामाला सुरवात झाली नाही. गेल्या दहा वर्षांपासून हा घोळ काही मिटला नाही. राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव असल्याने नाट्यगृहाचे भिजत घोंगडे पडले आहे.

सुमारे एक हजार आसन क्षमतेचे हे प्रस्तावित नाट्यगृह कधी पूर्ण होणार असा प्रश्‍न आहे. नव्याने माऊली नाट्यगृह व सहकार सभागृह झाले पण महापालिकेचे नाट्यगृह काही उभे राहीना. त्यामुळे शहरातील सांस्कृतिक उपक्रम अडचणीत सापडले आहे. अर्थात महापालिका या रंगभवन व सावेडी नाट्यगृहाबाबत काहीच पावले उचलत नसल्याने आता रंगकर्मीनी देखील या नाट्यगृहाचा नाद सोडला आहे. गेल्या चार पाच वर्षापूर्वी रंगभवनची डागडूजी करण्यात आली. पण आज ते रंगभवन जैसे थेच झाले आहे. महापालिकेचे दुर्लक्ष झाले तसेच रंगकर्मी देखील त्याकडे फिरकले नाही.

महापालिकेने सावेडीच्या जुन्या क्रीडा संकुलाच्या जागेत एक हजार आसन क्षमतेचे नाट्यगृह प्रस्तावित केले आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये त्याचे भूमिपूजन झाले होते. महापालिकेला नाट्यगृह उभारणीसाठी सरकारने तीन कोटींचे अनुदान मंजूर करून त्यातील केवळ 60 लाख रुपयेच दिले होते. या पैशांसह शहरात जकात सुरू असताना संबंधित जकात ठेकेदाराकडून नाट्यसंकुलासाठी घेतलेल्या दीड कोटीच्या रकमेतून नाट्यगृहाचे बांधकाम सुरू केले गेले होते.

पण हे पैसे संपल्यावर तब्बल दीड वर्षे काम रखडले होते. नुकतेच या कामाला महापालिका फंडातून अडीच कोटी रुपये देण्यात आल्याचे समजते. महापालिकेतील राजकीय नेतेमंडळींचा यासाठी विरोध असतानाही तो डावलून जिल्हाधिकारी-आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडून नाट्यगृहाला प्राधान्य दिले गेल्याने आता या नाट्यगृहाच्या आसन व्यवस्थेसाठी स्लोपिंग स्लॅब टाकला गेला आहे व त्यावरील मुख्य इमारतीच्या स्लॅबचे काम सुरू आहे. पण ते पूर्ण व्हायला अजून किमान तीन-चार महिने लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

सुरुवातीला पाचशे आसन क्षमतेने महापालिकेचे नाट्यगृह एक हजार आसन क्षमतेचे केल्याने त्याची प्रकल्प किंमत बांधकाम व फर्निचरसह 11 कोटींची झाली आहे. आतापर्यंत केवळ साडेचार कोटी रुपये या कामासाठी मिळाले आहेत व सरकारकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या पैशांसह नव्याने महापालिका वा अन्य फंडातून कराव्या लागणाऱ्या आणखी तीन कोटींच्या निधी तरतुदीची प्रतीक्षा आहे. मनपा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने ती संपल्यावर व नवे महापालिका सभागृह अस्तित्वात आल्यानंतरच नाट्यगृह बांधकामास चालना मिळण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)