छिंदमच्या अर्जावर अधिकाऱ्यांना धमकविणारे चित्रीकरण व्हायरल

धमकी देणाऱ्या लाटेगल्लीतील एकाविरोधात कटाचा गुन्हा दाखल

नगर – शिवद्रोही श्रीपाद छिंदमचा अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात किंवा घरी जाऊन काळे फासू. छिंदमच्या अर्जाला सूचक व अनुमोदन देणाऱ्यांची नावे दिल्ली दरवाजा येथे फलकावर प्रसिद्ध करू, अशी धमकीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्याविरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सहायक आयुक्त शहाजहान तडवी यांनी ही फिर्याद दिली आहे.

-Ads-

भावेश अशोक राऊत (रा. लाटेगल्ली, नगर) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने अधिकाऱ्यांना धमकविले म्हणून हा गुन्हा करण्यात आला आहे. श्रीपाद छिंदम याने उपमहापौर असताना मोबाईलवरून संभाषण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमान होईल, असे वक्तव्य केले होते.

हे वक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. छिंदम हे भारतीय जनता पक्षाकडून उपमहापौर झाले होते. या वक्तव्यामुळे संपूर्ण देशभर राळ उठली होती. राज्यात यावरून तणाव निर्माण झाला होता. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्याची पक्षातून हकालपट्टी केली होती. छिंदम याचे नगरसेवक पद रद्द व्हावे यासाठी महापालिकेत विशेष महासभा होऊन त्यात ठराव झाला होता. नगरसेवक पद रद्दची सुनावणी सध्या मंत्रालयात सुरू आहे. यातच महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे.

श्रीपाद छिंदम याने उमेदवारी करण्याची तयारी सुरू केली आहे. तसे त्याने अर्ज देखील नेले आहेत. छिंदम याने आज अपक्ष म्हणून अर्ज देखील भरला आहे. परंतु हा अर्ज अधिकाऱ्यांनी स्वीकारू नये. स्वीकारल्यास संबंधित अधिकांऱ्याचे कार्यालयात किंवा घरी येऊन तोंड काळे करू, असे एक चित्रीकरण समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. हे चित्रीकरण व्हायरल करणाऱ्याने त्याचे नाव भावेश राऊत असे सांगून पत्ता देखील सांगितला आहे.

निवडणुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे चित्रीकरण पाहिल्यावर त्यांनी त्याची तक्रार जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली. राहुल द्विवेदी यांनी या चित्रीकरणाची गंभीर दखल घेत उपायुक्त सुनील पवार यांना यासंबंधी कारवाई करण्याचा आदेश दिला.

उपायुक्त सुनील पवार यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रभारी सहायक आयुक्त शहाजहान तडवी यांना प्राधिकृत केले. तडवी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार तोफखाना पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

भावेश राऊत याने याच्याविरोधात पोलिसांनी फौजदारी गुन्ह्याचा साथीदारांच्या मदतीने कट रचल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने भावेश राऊत याचा शोध सुरू केला आहे. भावेश राऊत हा गुन्हा दाखल होताच शहरातून पसार झाला आहे. त्याचा माग काढण्यात येत असल्याची माहिती मिटके यांनी दिली.

What is your reaction?
17 :thumbsup:
22 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)