‘प्लस’चा दावा; राजकीय पदाधिकारी गुंतले निवडणुकीच्या रणनीतीत

प्रदीप पेंढारे

नगर – महापालिकेसाठी आचारसंहिता दिवाळी अगोदरच लागू होताच राजकीय पक्षांच्या बेरीज-वजाबाकीच्या राजकारणाला वेग आला. राजकीय बैठकांचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. युती-आघाडी, मैत्रपूर्ण लढतीचे नियोजनावर शिक्कामोर्तबासाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले आहे. वरिष्ठ नेत्यांसह इच्छुक उमेदवारांच्या हालचाली वाऱ्यासारख्या होऊ लागल्या आहेत. दर मिनिटांना राजकीय गणिते जुळत आहेत. त्याचबरोबर ती फिस्कटतही आहेत. पक्ष नाही, तर आपण “अपक्ष’, याचीही इच्छुक चाचपणी करत पूर्ण ताकदीने मैदानात उतारण्याच्या तयारीत आहेत. हवसे-नवसे यांना आलेले उधाण वेगळेच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मतदारापर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार अराखडे बांधून त्यावर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे. पक्ष, अपक्षांच्या राजकीय घडामोडीत आजपासून पुढील 40 दिवस “मतदार राजा’ झाला आहे. दिवाळीपूर्व आचारसंहिता लागू झाल्याने मतदारांसाठी हा योग “दुग्धशर्करा’ ठरणार आहे. मतदारांपर्यंत पोहचून आपलीच सत्ता, असा दावा राजकीय पक्षाचे पदाधिकारी काही महिन्यापूर्वी करत होते, त्यावर ते आजही ठाम आहेत.

काही राजकीय पक्षांनी एजन्सींना नेमून मतदार राजाचा “प्लस-मायनस’चा अंदाज घेत आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय रिपब्लिकन पक्षासह सर्व पक्षाचे पदाधिकारी महापालिकेत “प्लस’च राहू, असा दावा करत आहेत. परंतु हे चित्र दहा डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल.

भाजपकडे एकहाती सत्ता असेल

भारतीय जनता पक्षाने महापालिका निवडणुकीसाठी एकला चलीोच पूर्वीच भूमिका घेतली होती. आता तर युतीची वेळ निघून गेली आहे. भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीला उतरलेला आहे. महापालिकेत 41 “प्लस’ असे भाजपचे चित्र असेल. एकहाती सत्ता असेल. भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. तिकीट वाटपाचे नियोजन पूर्ण होत आले आहे. पहिल्या यादीवर 14-15 तारखेला शिक्कामोर्तब होईल. प्रचाराचे नियोजन केले आहे. भाजपची बुथरचना प्रबळ केली आहे. त्याचा अनुभव या निवडणुकीत येईलच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभाचे नियोजन आहे.
– खासदार दिलीप गांधी शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

महापौर शिवसेनेचाच होणार

शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. त्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. युवा कार्यकर्त्यांपासून ते मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी शिवसेनेने सुरूवातीपासून काम केले आहे. काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार दिसतील. सत्तेसाठी लागणारे संख्याबळ शिवसेनेकडे 35 “प्लस’ असेच असेल. परिणामी महापौर शिवसेनेचाच होईल. तिकीट वाटप निश्‍चित झाले आहे. पहिली यादी दिवाळीनंतर लगेचच प्रसिद्ध होईल. युवक आणि ज्येष्ठ असा मेळ उमेदवारीत घालून देण्यात आला आहे. शिवसेनेने लाचारीचे राजकारण केलले नाही. नगरकरांपासून ते लपलेले देखील नाही. ही निवडणूक दहशतमुक्तीची असेल, याची खात्री आहे.
– दिलीप सातपुते शहरप्रमुख, शिवसेना

विकासाचे राजकारण जिंकणार

आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाची अनेक कामे मार्गी लावली आहेत. या निवडणुकीत भावनात्मक राजकारणापेक्षा विकासाचे राजकारण सरस ठरणार आहे. विकासाच्या राजकारणासाठी समविचारी पक्षांची मोट बांधणे सुरू आहे. ती अंतिम टप्प्यात आहेत. कॉंग्रेसबरोबर आघाडीचा निर्णय दोन दिवसात मार्गी लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस 35 “प्लस’, अशीच राहिल. विरोधकांच्या कोणत्याही आरोपाला विकास काम हेच आमचे उत्तर राहणार आहे. नगरकर जागरूक आहेत. ते विकासाबरोबर आहेत. त्यामुळे महापालिकेत महापौर राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच दिसेल.
– प्रा. माणिकराव विधाते शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

कॉंग्रेस 33 जागा जिंकेल

कॉंग्रेसची राष्ट्रवादीबरोबर 2003 पासून आघाडी आहे. आघाडी निश्‍चित होईल. परंतु तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. कॉंग्रेस 25 ते 33 जागा जिंकेल, असा अंदाज आहे. तसे उमेदवारही आमच्याकडे आहेत. पक्षाच्या आघाडीची व प्रचाराची रणनीती निश्‍चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते प्रचारात असणार आहेत. नगरकरांसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहोत.
-दीप चव्हाण शहर जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

मनसे प्रभाव दाखविणारच

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही किंगमेकरच्या भूमिकेत महापालिका निवडणुकीला समोरे जाणार आहे. गेल्या पंचवार्षिकला मनसेशिवाय सत्ताधारी व विरोधकांकडे पर्याय नव्हता, हे नगरकरांनी पाहिले आहे. यावेळी त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थितीत मनसे राहणार आहे. 40 उमेदवार निश्‍चित झाले आहेत. पक्ष निरीक्षकांच्या आदेशानुसार प्रचाराचे नियोजन झाले आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे नियोजन करत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाने “प्लस’चा दावा केल्यास, ती फोलच ठरणार आहेत. मनसेच्या सत्तेने नाशिकचा कायापालट केला. हा विकासाचा मुद्दा नगरकर विसरणार नाहीत.
– सचिन डफळ जिल्हाध्यक्ष, मनसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)