निवडणुकीवर जिल्हा प्रशासनाची नजर

आजपासून महापालिका निवडणूक प्रक्रिया  सुरू; महापालिकेच्या संकेतस्थळावर उमेदवार अर्ज उपलब्ध होणार


ना हरकत प्रमाणपत्रासाठी बारा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या लागणार

नगर – महापालिका निवडणुकीची अधिसुचना उद्या जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज घेण्यास दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर उमेदवारी अर्ज उद्यापासून उपलब्ध होणार असून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. अर्ज दाखल करतांना ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागणार असून त्यासाठी तब्बल बारा अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या उमेदवारांना द्याव्या लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून उमेदवारांना अर्जबरोबरच ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. सध्या इच्छुकांकडून प्रमाणपत्र जमा करण्यासाठी एकच धांदळ उडाली असून महापालिकेच्या सर्वच प्रभाग कार्यालयामध्ये गर्दी होत आहे.

महापालिका निवडणुकीच्या 68 जागांसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी उद्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. गेल्या 1 नोव्हेंबरला महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आली. तेव्हापासून आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. महापालिकेने तीन प्रभागासाठी स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती केली असून त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्याबरोबर आचारसंहिता कक्ष व निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

त्यात प्रभाग क्र. 1, 6 आणि 7 साठी नगर उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तर प्रभाग क्र. 2, 4 आणि 5 साठी विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी या निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलात (आकाशवाणीशेजारी) असेल. प्रभाग क्र. 3, 9 आणि 10 साठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, तर प्रभाग क्र. 8, 11 आणि 12 साठी विशेष भूसंपादन अधिकारी शाहूराज मोरे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांचे कार्यालय प्रभाग समिती क्र. 2 जुना मंगळवार बाजार येथे असेल.

प्रभाग क्र. 13 आणि 14 साठी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी प्रजित नायर निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय बुरुड़गाव विभागात आहे. प्रभाग क्र. 15, 16 आणि 17 साठी उपविभागीय अधिकारी (श्रीगोंदा-पारनेर) गोविंद दाणेज निवडणूक निर्णय अधिकारी असून, त्यांचे कार्यालय केडगाव येथे असेल.

उद्यापासून उमेदवारी अर्ज घेण्यासह दाखल करण्यास प्रारंभ होणार असून दि. 20 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटीची मुदत राहणार आहे. त्यानंतर 22 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. तर 26 नोव्हेंबर अर्ज माघारीची अंतिम तारीख राहणार आहे. दि. 9 डिसेंबर रोजी मतदार होणार आहे. त्यामुळे उद्यापासून खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेवून आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश द्विवेदी यांनी दिले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अरूण आंनदकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विविध सुचना दिल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)