मोहरमची मिरवणूक ठरली ऐतिहासिक

25 ते 30 वर्षानंतर झाले नियोजित वेळेवर विसर्जन : अत्याधुनिक कॅमेऱ्यांसह मिरवणुकीला मोठा पोलीस बंदोबस्त

नगर – “कत्तल की रात’ आणि मोहरमची मुख्य मिरवणुकीचे विसर्जन यावर्षी नियोजनापेक्षा वेळेत झाल्याने इतिहास घडला आहे. गेल्या 25 ते 30 वर्षात असे घडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मोहरमच्या मिरवणुकीतील छोटे इमामांची सवारी सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी, तर बडे इमामांची सवारी त्यानंतर लगेचच सात मिनिटांच्या अंतराने दिल्ली दरवाजा बाहेर पडली. यावेळी हिंदू-मुस्लिम भाविकांनी एकच जल्लोष केला. शहर पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे ही मिरवणूक यशस्वी झाली. दिल्ली दरवाजा येथून सवारी पुढे सरकताच शहर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव झाला. सवाऱ्यांच्या विसर्जन स्थळी आणि तेथून मागे फिरणारा जमाव जाईपर्यंत पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

-Ads-

“कत्तल की रात’ची मिरवणूक गुरूवारी मध्यरात्री बारा वाजता सुरू झाली. ही मिवरणूक देखील नियोजित वेळेतच सुरू झाली. या मिरवणुकीला देखील मोठा पोलीस बंदोबस्त होता. या मिरवणुकीत काही टारगटांनी उच्छाद घालण्याचा प्रयत्न केला होता. तोफखाना पोलिसांनी त्यातील सुमारे 10 ते 12 जणांना ताब्यात घेतले होते. यानंतर मात्र मिरवणूक सुरळीत सुरू झाली. नियोजित मार्गावर वेळेवर जात ही मिरवणूक सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी पुन्हा कोठला येथे आली. यानंतर मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला सुरूवात होणार होती. त्याची तयारी यंग पार्ट्यांनी सुरू केली होती. सवारी खेळविण्यासाठी कोठला येथे नगर शहरासह उपनगरातील यंग पार्ट्यांनी गर्दी केली.

नमाज होताच दुपारी बारा वाजता छोटे इमाम यांची सवारी खेळविण्यास यंग पार्ट्यांनी सुरूवात केली. कोठला येथून दुपारी एक वाजता सवारी बाहेर आल्या. दरवर्षी येथे सवारी खेळविताना यंग पार्ट्या मोठ्या वेळ घेतात. यावर्षी मात्र कोठला येथून सवारी पुढे सरकताच पोलिसांनी त्यांच्यामागे तीन मोठ्या व्हॅन उभ्या केल्या होत्या. व्हॅनपुढे मोठा पोलीस बंदोबस्त होता. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे या बंदोबस्ताचे नेतृत्व करत होते.

हवेलीत दुपारी दोन वाजता बडे आणि छोटे इमाम सवारी एकत्र आल्या होत्या. हिंदू-मुस्लिम भाविकांनी येथे एकत्र आले होते. हवेलीत सवारी खेळविण्यात वेळ जात असल्याचे पाहून पोलिसांनी यंग पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांना तेथून बाहेर काढले. यानंतर मात्र मिरवणुकीच्या पारंपारिक मार्गावर सवारी पुढे सरकत राहिल्या. नियोजीत वेळेपेक्षा सवारी मार्गांवर पुढे सरकत होत्या. या मिरवणुकीत सवारींच्या मागे पोलिसांच्या तीन व्हॅन कायम होत्या. मार्गा व्यतिरीक्त कार्यकर्त्यांना इतरत्र सवारी घेऊन जाता येऊ नये म्हणून रस्त्यावरील मार्ग “ब्लॉक’ करण्यात आले होते.

दरवर्षी सवारी पुढे-मागे करण्यात येत होती. यावर्षी मात्र तसे काही झाले नाही. सवारी पुढे सरकली की पोलिसांची तिन्ही वाहने पुढे येत होती. त्यामुळे सवारी मागे फिरवता येत नव्हती. जुनी महापालिका येथे दुपारी साडेतीन वाजताच सवारी आल्या होत्या. बडे इमाम यांची सवारी पुढे शांततेत सरकत होती. भाविक नवसपूर्तीसाठी सवारीचे दर्शन घेत होते. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना सरबताचे वाटप करण्यात येत होते.

काही क्षणातच सवारी येथून पुढे सरकली आणि चौपाटी कारंजा येथे पाच वाजता आली. यावेळी युवक आणि तरूणांची मोठी गर्दी केली होती. “या हुसेन’च्या घोषणांनी युवकांनी दिल्ली दरवाजा परिसर दणाणून सोडला होता. बडे इमाम यांची सवारी, त्यानंतर पंजे आणि त्यानंतर ताबूत, असे मनमोहक दृश्‍य सायंकाळी पाच वाजता दिल्ली दरवाजा वेशीतील आतील भागात भाविकांना पाहयला मिळाले. बडे इमाम यांची सवारी दिल्ली दरवाजा येथे जाऊन थांबली. त्यानंतर लगचेच छोटे इमाम यांची सवारी दिल्ली दरवाजा येथे आली.

दिल्ली दरवाजा येथे छोटे इमाम यांची सवारी येताच भाविकांनी एकच जल्लोष केला. छोटे इमाम यांची सवारी पुढे जाईपर्यंत बडे इमाम यांची सवारी दिल्ली दरवाजाच्या आतच थांबली होती. नीलक्रांती चौकात छोटे इमाम यांची सवारी पोहचल्यानंतर दिल्ली दरवाजात उभे असलेली बडे इमाम यांची सवारी बाहेर पडली. यानंतर बालिकाश्रम रोडने दोन्ही सवारी विसर्जन स्थळी रवाना झाल्या. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाचशे पोलिसांचा बंदोबस्त या मिरवणुकीला होता. या बंदोबस्ताचे नेतृत्व शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करत होते.

पोलिसांवर कौतुकाचा वर्षांव

मोहरम मिरवणूक गेली 25 ते 30 वर्षांपासून कधीच नियोजित वेळेत झाली नाही. याला एखादे वर्षे अपवाद असेल. परंतु शहर पोलिसांनी यावर्षी मात्र केलेले नियोजन हे ऐतिहासिकच ठरले. मिरवणूक नियोजीत वेळेपेक्षा लवकर झाली. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आणि शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह संपूर्ण पोलीस दलाचे याबाबत कौतुक होत होते. विशेष म्हणजे, या मिरवणुकीचा अनुभव नसलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताला होते. बहुतांशी अधिकारी हे नव्याने नियुक्त झालेले आहेत. पोलिसांवरील कौतुकाचे पडसाद समाज माध्यमांवर देखील उमटले. गणेश उत्सव आणि मोहरम यावर्षी एकत्र आले होते. त्याचे नियोजन पोलिसांनी महिनाभर अगोदर केले होते. त्याची खरी सुरूवात शहरातून एकता रॅली काढण्यापासून झाली होती.

संदीप मिटकेंना कार्यकर्त्यांनी घेतले खांद्यावर

“कत्तल की रात’ची मिरवणूक वेळेवर आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता झाल्याचे श्रेय यंग पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या उत्कृष्ट नियोजनाला दिले. शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या मिरवणुकीचे नियोजन केले होते. संदीप मिटके यांच्या कौतुकासाठी यंग पार्ट्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले होते. उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहराचा काही महिन्यापूर्वीच पदभार घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या मिरवणुकीचे नियोजन त्यांच्याकडे यावर्षी होते. त्यांनी ते यशस्वी करून दाखविले.

मिरवणुकीतील गर्दीचा आलेख घसरला

मोहरमच्या विसर्जन मिवरणूक यावर्षी काहीशी गर्दी कमी होती, असे जाणकारांचे म्हणणे आले. स्थानिक पोलिसांनी देखील त्याला दुजोरा दिला. दरवर्षी मोहरम विसर्जन मिवरणुकीला मोठी गर्दी असते. यावर्षी मात्र ती जाणवली नाही. “कत्तल की रात’च्या मिरवणुकीलाही दरवर्षी गर्दी असायची. ती यावर्षी मात्र कमी होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)