राठोडांचे वर्चस्व असलेला मंडप जमीनदोस्त

मनपाची कारवाई : प्रशासनाविरोधात शिवसेना आक्रमक, निषेध आरती आणि उपोषण 

नगर – शहर मध्यवर्ती ठिकाणी चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मित्र मंडळांच्या मंडपाचा बेकायदेशीर, असा काही भाग महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज कारवाई करत हटविला. हे मंडळ शिवसेनेचे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मंडपावरील कारवाईमुळे शिवसेनेचे माजी आमदारांसह पदाधिकारी चांगलेच संतप्त झाले असून, प्रशासन दंडेलशाही करत असल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, प्रशासनाने मंडळांनी नियमानुसारच मंडप उभारले पाहिजेत, अशी ठाम भूमिका घेतली आहे. राजकीय आणि प्रशासकीय, असे दंद्व दिवसभर रंगले होते. यावर सायंकाळपर्यंत तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात तणावाचे वातावरण होते.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळी आठ वाजता रस्त्यावरील रहदारीला अडथळा होणाऱ्या मंडपांवर कारवाई केली. चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मित्र मंडळाच्या मंडपाचा काही भाग काढून टाकला. जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई केल्याने मंडपाचे यात नुकसान झाले. यानंतर माळीवाडा बसस्थानकासमोर प्रेरणा प्रतिष्ठानने दहिहंडीचा उत्सव आयोजित केला होता. यासाठी उभारण्यात आलेला मंडप हा नियमापेक्षा अधिक रुंद होता. अतिक्रमण पथकाने मंडपाचा अतिरीक्त भाग काढून घेतला. आमदार संग्राम जगताप यांचे हे मंडळ आहेत. परंतु कारवाईसाठी पोहचलेल्या पथकाला येथे सहकार्य मिळाले. यानंतर स्वास्तिक चौकात नगरसेवक अनिल शिंदे यांच्या मंडळाने नियमापेक्षा मोठ्या आकाराचा मंडप उभारला होता.

पथक या मंडपावर जेसीबी फिरवणार, शिंदे यांनी येथे समजुतीची भूमिका घेत मंडपाचा आकार नियमात बसून घेतो, अशी ग्वाही दिली. तशी त्यांनी तत्काळ कार्यवाहीला सुरूवात केली. त्यामुळे पथकाने येथील कारवाई थांबवली. दरम्यान, महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने काल रविवारी रात्री बंटी डापसे यांचे आडतेबाजारातील मंडळाचे आणि मंगलगेट येथील एका मंडळाच्या मंडपावर कारवाई केली होती. याच कारवाईच्या दरम्यान, नेता सुभाष तरुण मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मंडपाच्या आकारावरून प्रशासनाने सूचित केले होते.

चितळे रोडवरील नेता सुभाष तरुण मित्र मंडळाच्या मंडपावर कारवाई म्हणजे, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेला डिवचण्याचाच प्रकार प्रशासनाने केला. शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, त्यांचे पूत्र विक्रम यांच्यासह पदाधिकारी या कारवाईमुळे चांगलेच संतप्त झाले. शिवसेनेने प्रशासनावर दंडेलशाहीचा आरोप केला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण पथकातील परिविक्षाधीन जिल्हाधिकारी प्रजीत नायर आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे विक्रम राठोड व राऊत मंडप डेकोरेटर्सने तक्रारी अर्ज केला आहे.

धार्मिक उत्सवासाठी उभारण्यात आलेला मंडप कोणतीही पूर्व सूचना न देता तो प्रशासनाने काढून टाकत त्याचे नुकसान केले आहे. यात मंडपाचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, असे अर्जात म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी हा तक्रारी अर्ज तोफखाना पोलिसांकडे पुढील चौकशीसाठी वर्ग केला आहे. याप्रकरणी शिवसेनेने प्रशासनाला सद्‌बुद्धी मिळो, यासाठी मोडलेल्या मंडपाशेजारी गणपतीची प्रतिमा उभारत पूजा केली. हिंदूच्या सणावर प्रशासनाच्या दादागिरीचा जाहिर निषेधाचा फलक देखील झळकविला. शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम, गणेश कवडे, संजय शेंडगे, अनिल शिंदे, योगीराज गाडे आदी यावेळी उपस्थित होते. प्रशासनाच्या दंडेलशाहीविरोधात अनिल राठोड यांनी नेता सुभाष चौकात उपोषण सुरू केले होते.

रस्त्यावर गपणती बसविणार : राठोड यांचा इशारा

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रशासनाची दंडेलशाही सुरू आहे. हिंदू समाज बांधवांच्या भावना चिरडून टाकण्यासाठीच अधिकारी काम करत आहेत. उत्सव शांततेत व्हावा, अशी प्रशासनाची इच्छा दिसत नाही. मंडपाची तोडफोड करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला कुणी? हिंदूच्या भावनांचा विचार होत नसेल, तर त्याविरोधात आता रस्त्यावरच गणपती बसवणार, असा पवित्रा घेत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी प्रशासनाविरोधात नेता सुभाष चौकात उपोषण सुरू केले.

मंडप उभारणीच्या जाचक अटी शिथील करा

गणेशोत्सवानिमित्त शहरात मंडप उभारणीला वेग आला आहे. मंडप उभारणीसाठी महापालिकेने जाचक अटी घातल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना मंडळ देखाव्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. परंतु जाचक नियम व अटींमुळे मंडळांना मंडप उभारणीत अडचणी येत आहेत. या अटी शिथील करण्यात याव्यात, असे निवेदन खासदार दिलीप गांधी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना भेटून दिले.

मंडप नियमानुसारच हवा : प्रशासन ठाम

शहरात गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणारे मंडप हे नियमातच हवे, या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली. रस्त्यावर उभारण्यात येणारा मंडप हा रस्त्याच्या रुंदीच्या 40 टक्केच हवा. 60 टक्के जागा ही रहदारीसाठी मोकळी असवी. त्याचप्रमाणे मंडप प्रशासनाच्या परवानगी शिवाय उभारल्यास तो बेकायदेशीरच ठरतो. प्रशासन साइज ठरवून देईल, त्याचप्रमाणे मंडपाचा आकार असावा, अशीही माहिती इथापे यांनी दिली.

मंडपाच्या आकाराची तपासणी होणार

शहरातील प्रत्येक गणेश मंडळाच्या मंडपाच्या आकाराची पाहणी होणार असल्याचे माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी दिली. तहसीलदार, महसूल विभाग, उपप्रादेशिक परिवहन, महापालिका, पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक या पथकात असतील. या पथकाचा मंडपाबाबत अहवाल आल्यावर पुढीला कार्यवाही होईल. मंडपाचा आकार अहवालानुसार मोठा असल्यास त्या मंडळावर तत्काळ कारवाई होईल, असेही इथापे यांनी सांगितले.

अडथळा हटविण्याचे प्रशासनाला पूर्ण अधिकार

नेता सुभाष तरुण मित्र मंडळाच्या मंडपावर कारवाई होताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने नियमाकडे बोट दाखवित प्रांतिक महापालिका 1949 च्या कायद्यातील 231 कलमातील तरतुदींकडे लक्ष वेधले आहे. या कलमानुसार महापालिकेला रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणारी कोणतीही अतिक्रमणे पूर्व नोटिस न बजावता काढून घेता येऊ शकतात. ही माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. नेता सुभाष तरुण मित्र मंडळांच्या मंडपावरील कारवाईसाठी प्रशासनाने हीच मात्रा लागू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)