वादग्रस्त नेत्यांचा प्रवेश ‘भाजप’ला मारक

File photo

अभय आगरकर यांची स्पष्टोक्ती; विचारधारेला महत्त्व देण्याची आवश्‍यकता

-भागा वरखडे

कोअर समितीची लवकरच बैठक

भाजपने एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जावे, यासाठी पक्षाने एक कोअर समिती नेमली आहे. तिची अजून एकही बैठक झाली नाही. त्यामुळे खा. गांधी व ऍड. आगरकर यांच्यात मुंबईच्या बैठकीनंतर एकत्र काम करण्याबाबत चर्चाच झाली नाही. कोअर समितीचे सदस्य तेलंगणाच्या प्रचारात गुंतले असल्याने पक्षातील नाराजीनाट्यावर पडदा पडलेला नाही. आगामी दोन दिवसांत कोअर समितीचे सदस्य तेलंगणावरून परत येतील. त्यानंतर बैठक होण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगर – कोणताही पक्ष हा विचारधारेवर चालतो, वाढतो. दीर्घकाळाचा विचार करून पक्षात प्रवेश दिले पाहिजेत; परंतु सध्या नगरमध्ये वादग्रस्त पार्श्‍वभूमीच्या लोकांना प्रवेश देण्याचे घाऊक सोहळे सुरू असून भाजपला ते मारक आहेत. विचारधारेच्या लोकांना संधी देण्याचा हाच काळ असताना त्यांना डावलून उपऱ्यांना संधी दिली, तर ते पक्षाला हानीकारक ठरेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर यांनी दिला.

नगरमध्ये खा. दिलीप गांधी व ऍड. आगरकर असे भाजपत दोन गट आहेत. ऍड. आगरकर यांचा गांधी यांना असलेला विरोधही जगजाहीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य श्रेष्ठींनी दोघांना एकत्र येऊन नगर महापालिकेची निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्यास सांगितले आहे. असे असताना खा. गांधी यांनी ऍड. आगरकर यांना विश्‍वासात घेतलेले दिसत नाहीत.

सध्या गांधी यांनी नगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षप्रवेश आणि सभांवर भर दिला असताना ऍड. आगरकर मात्र कोठेही दिसत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर ऍड. आगरकर यांनी “प्रभात’ला खास मुलाखत दिली. त्यात त्यांनी अनेक मुद्‌द्‌यांवरच्या खा. गांधी यांच्यांशी असलेल्या मतभेदांची वाच्यता केली.

भाजप प्रवेश म्हणजे उमेदवारी निश्‍चिती नव्हे

ज्यांनी आता भाजपत प्रवेश घेतला, त्यांनी उमेदवारी निश्‍चिती नक्की मानली असेल; परंतु ऍड. आगरकर यांनी मात्र प्रवेश म्हणजे उमेदवारी निश्‍चिती नव्हे, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी कोअर समिती करणार असून त्यांनाच उमेदवारी देण्याचा अधिकार आहे, प्रवेश देणाऱ्यांना नव्हे, असे त्यांनी निदर्शनास आणले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्‌गार काढलेल्यांशी आतून छुपा समझोता हा राष्ट्रद्रोह असल्याचा आरोप करताना ऍड. आगरकर यांनी थेट खा. गांधी यांचे नाव घेण्याचे टाळले. श्रीपाद छिंदम यांच्यासारख्या देशद्रोह्याला खरे तर नगरमध्ये फिरू द्यायला नको. त्याची जिभ हासडायला हवी;परंतु काही लोक त्यांनाच मदत करतात.

त्याची किमंत पक्षाला राज्यपातळीवर मोजावी लागू शकते, याची जाणीव करून देऊन ते म्हणाले, की अशा अपप्रवृत्तींना पाठिशी घालून आपणच विरोधकांना टीकेची संधी देत आहोत. भाजपकडे चांगले उच्चशिक्षित लोक आहेत. त्यांनी काही प्रभागात उमेदवारीही मागितली आहे. भाजपची विचारधारा घेऊन पुढे जाणाऱ्यांना आपण संधी द्यायला हवी; परंतु ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे आहेत, जे लोक आले, की प्रभागातील नागरिक घरे बंद करतात, अशांना उमेदवारी देण्याचे घाटत आहे. त्यासाठी त्यांचे प्रवेशसोहळे घडवून आणले जात आहेत.

काही प्रभागात तर भाजपकडे पुरेसे सक्षम उमेदवार असताना तिथे बाहेरच्या आणखी लोकांना आयात करून आपल्याच जुन्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ केले जात आहे, हे चुकीचे आहे. आपल्याकडे ज्यांनी आतापर्यंत सतरंज्या उचलण्याचे काम केले. ज्यांनी भाजपसाठी आयुष्य वेचले, त्यांना जेव्हा कुठे एखाद्या पदाची संधी मिळते, तेव्हा त्यांना ती अगोदर दिली पाहिजे; परंतु पक्षाच्या कोणत्याही विचारधारेशी संबंध नसणाऱ्यांना त्यांच्या स्वतः च्या फायद्यासाठी प्रवेश दिला जात असेल, तर ते योग्य नाही. आपल्या वैचारिक भूमिकेत ते बसत नाही. त्यामुळे अशा प्रवेश सोहळ्यांपासून आपण मुद्दाम स्वतःला दूर ठेवले आहे.

भाजपचे गुन्हेगारीकरण?

भाजपने आतापर्यंत कायम अन्य पक्षांच्या गुन्हेगारीकरणावर टीका केली. आता त्याच पक्षांच्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना भाजपत प्रवेश दिला, तर आम्हाला इतरांवर टीका करण्याचा अधिकारच राहणार नाही. उलट, लोक भाजपचे गुन्हेगारीकरण झाले, अशी टीका करतील. त्या वेळी आपल्याकडे काय उत्तर असेल, याचा विचार गुन्हेगारांना प्रवेश देणाऱ्यांनी करायला हवा, असा सल्ला ऍड. आगरकर यांनी दिला.

भाजप हा केडरबेस पक्ष आहे. त्याची वैचारिक बैठक वेगळी आहे. वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, विद्यार्थी परिषद आदी वेगवेगळ्या माध्यमातून भाजप आणि संघाच्या वेगवेगळ्या शाखा सामाजिक काम करीत असतात. त्यांनी आतापर्यंत कधी सत्तेच्या पदाची अपेक्षा केली नाही, असे सांगून ऍड. आगरकर यांनी नगर भाजपमध्ये घुसलेल्या सध्याच्या पंचतारांकित संस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली. लोक भाजपकडे वेगळ्या आशेने पाहतात. सत्ता हे साध्य म्हणून भाजप कधीच पाहत नव्हता.

सामाजिक सेवेसाठी सत्तेचे साधन म्हणून वापर केला पाहिजे, असे भाजपला वाटते. अशा कामांतून भाजपची दीर्घकाल वाटचाल राहिली आहे. केवळ सत्ता मिळविण्यासाठी विधिनिषेधशून्य तडजोडी करीत राहिलो, तर ते भाजपच्या हिताचे नाही. एकवेळ सत्ता थोडी उशिरा मिळाली तरी चालेल; परंतु वादग्रस्त लोकांना घेऊन मिळालेली सत्ता दीर्घकाळ टिकत नसते.

आता पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिली नाही, तर ते लगेच दुसरीकडे जायला मोकळे होतील. त्यापेक्षा आपल्याच चांगल्या कार्यकर्त्यांना संधी दिली, तर पक्षाचा विचार रुजविण्यासाठी ते उपयोगी पडतील. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही असे लोक पक्षाच्या मदतीला येतील. उपऱ्यांबाबत तसे म्हणता येत नाही, अशा स्पष्ट शब्दांत ऍड. आगरकर यांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)