नायब तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता झाला खुला
भावीनिमगाव – शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव- सुकळी हा रस्ता झाडांच्या अतिक्रमणाने वेढला होता. ते अतिक्रमण काढण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध होता. हा रस्ता जाण्यायेण्यासाठी योग्य राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी संबधितांना निवेदनाद्वारे रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी (दि.1) सकाळी 9 ते 1 असे चार तास रास्तारोको आंदोलन केले.
सुमारे चार तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या. रस्ता दुरूस्ती आंदोलनात महिला, पुरुष व शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. रस्ता दुरूस्त होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या निर्णयावर सर्वजण ठाम होते. या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार मयुर बेरड व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी पुढाकार घेऊन स्वतः रस्त्याची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा करत तात्काळ निर्णय घेऊन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील झाडांचे अतिक्रमण हटवून रस्ता जाण्यायोग्य खुला केला. तसेच भावीनिमगाव – सुकळी हा पानंद रस्ता, राजस्व अभियानांतर्गत मोकळा करून रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र एक महिन्यात काम न झाल्यास भातकुडगाव फाटा येथे बेमुदत रास्तारोको आंदोलन केले जाईल असा इशारा संतोष आडकित्ते यांनी दिला.
यावेळी दिलीप मरकड, महादेव काळे, शाम जाधव, अनिल सुपेकर, मच्छिंद्र मरकड, हरी करवंदे, सुरेश थोरात, सुधाकर शिरसाठ, गजानन वाबळे, दिलीप काळे, मुकेश करवंदे, बाबासाहेब भालके, चंद्रसेन मुरकुटे, राम करंडे, प्रविण मरकड ,मिराबाई मुरकुटे, कल्पना मरकड आदी शेतकऱ्यांच्या उपस्थित नायब तहसीलदार बेरड व सहा.पोलिस निरीक्षक मगर यांनी निवेदन स्विकारले.
कामगार तलाठी शशिकांत पाटील, ग्रामसेवक चंद्रकांत जोशी, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, तालुका समन्वय आसिफ सय्यद, भावीनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड, आदी उपस्थित होते. आंदोलन काळात पोलीस कर्मचारी वैजिनाथ चव्हाण, योगेश गणगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा