नगर- बीड रस्त्यावरील खड्डे बनले ‘यमाचे अड्डे’

संग्रहित छायाचित्र

जामखेड – जामखेड येथून जाणाऱ्या नगर-बीड या महामार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली. प्रशासनाकडे वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करुनही दखल घेतली जात नसल्याने वाहनधारकांतून संताप व्यक्‍त होत आहे. या मार्गावरील खड्डे वाचविण्याच्या नादात अंदाज चुकून वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दर सहा महिन्यांनी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. परंतु पाऊस झाल्यावर परिस्थिती पुन्हा “जैसे थे’ होत आहे. त्यामुळे महामार्गावरील हे खड्डे यमाचे अड्डे बनल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे.

शहरातून जाणाऱ्या नगर – बीड महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचा बळी जात आहे.

प्रशासनाकडे वेळोवेळी महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करून तसेच या गंभीर समस्येकडे लक्ष वेधूनही कोणीच दखल घेण्यास तयार नाही. यामुळे शहरातील नगर रस्ता, बीड रस्ता, जामखेड बाजार समिती परिसर, कोठारी पेट्रोल पंप परिसरातील महामार्गावरील मोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठे अवजड वाहन या खड्ड्यात अडकून बंद पडत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीही होत आहे. महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र, दोन-तीन दिवसात खुड्ड्यांची दुरवस्था होते.

त्या खर्चात झाला असता नवीन रस्ता

अनेक वर्षांपासून महामार्गावरील खड्डे तसेच आहेत. वर्षातून तीन-चार वेळेस खड्डे बुजविण्याचा प्रकार होत आहे. मात्र, चार दिवसांनी परिस्थिती पुन्हा जैसे-थे होते.त्यामुळे वाहनधारक, नागरिकांना स्वतःचा जीव मुठीत धरून घर गाठावे लागत आहे. खड्डे बुजविण्यावर जितका खर्च होतोय, त्याचा हिशोब घातला तर त्या खर्चात संपूर्ण रस्ता डांबरी झाला असता. मात्र, मलमपट्टी करण्यात धन्यता मानणाऱ्या संबंधित विभागास हे कधी कळणार, हे कोडे येथील नागरिकांना अद्याप उलगडले नाही. अजून किती जीव जाण्याची प्रतीक्षा करीत आहेत हेच कळेना.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)