शहर बॅंकेच्या मुख्य शाखेवर आर्थिक गुन्हे पोलिसांचा छापा

डॉ. शेळके घोटाळ्याचा केंद्रबिंदू : सहा जणांकडील चौकशी पूर्ण 

नगर – शहर सहकारी बॅंकेतील कर्ज घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या घोटाळ्याचा केंद्रबिंदू डॉ. नीलेश शेळके हा आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, त्याची इतर बॅंकांना देखील झळ बसण्याची शक्‍यता आहे. मशिनरी खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याची माहितीला पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दुजोरा दिला. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहर बॅंकेच्या मुख्य कार्यालयावर आज सायंकाळी चार वाजता छापा घातला. या पथकाकडून बॅंकेत रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

-Ads-

शहर बॅंकेच्या घोटाळ्याची चौकशी जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. आतापर्यंत सहा जणांची कसून चौकशी झाली असून, ती पूर्ण झाली आहे. तालुका उपनिबंधक राम कुलकर्णी यांची आज दिवसभर चौकशी करण्यात आली. कर्ज वितरणात झालेल्या घोटाळ्याची तक्रार फिर्यादींनी सुरूवातीला सहकार आयुक्त आणि उपनिबंधकांकडे केली होती. राम कुलकर्णी यांनी चौकशी करून कर्ज वितरणातील त्रुटींवर बोट ठेवणारा अहवाल दिला होता. फिर्याद दाखल करून घेताना पोलिसांनी हा अहवाल महत्त्वपूर्ण मानला आहे. त्यानुसार राम कुलकर्णी यांच्याकडे या दृष्टिने चौकशी करण्यात आली.

राम कुलकर्णी आज दिवसभर त्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेत होते. अहवालातील बारीकसारीक गोष्टींवर पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. कर्जाची कागदपत्रे, कर्जदार व जामिनदारांचे विवरण पत्र, तारण मालमत्ता, जामिनदारांच्या विविध मालमत्तांची कागदपत्रे, हॉस्पिटलमधील मशिनरींचे कोटेशनची कागदपत्रांचा यात समावेश होता. राम कुलकर्णी यांच्याकडे केलेल्या चौकशीत पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती आली आहे. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी त्यालाही दुजोरा दिला.

डॉ. नीलेश शेळके कर्ज घोटाळ्याचा केंद्रबिंदू आहे. त्याच्याकडेही चौकशी होणार आहे. त्यानुसार त्यांनाही पोलिसांनी नोटिस बजावली आहे. या कर्ज घोटाळ्याची व्याप्ती वरकरणी छोटी वाटत असली, तरी तो मोठी असल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षकांनी दुजोरा दिला आहे. या कर्ज घोटाळ्याची इतर बॅंकांना देखील झळ बसू शकते, असेही त्यांच्या बोलण्यातून संकेत आले. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, कर्ज घोटाळ्यातील प्रत्येक गोष्टींची बारकाईने तपासणी करून निश्‍चित करण्यात येत आहे. पोलिसांचा हा तपास शहर बॅंकेसह कर्ज घोटाळ्याशी निगडीत असणाऱ्यांना भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे, असेच दिसते आहे.

सभासद व ठेवीदार अस्वस्थ

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज शहर बॅंकेच्या मुख्य शाखेत जाऊन अचानक तपासणीला सुरूवात केली. कर्ज घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे सभासदांसह ठेवीदार अस्वस्थता पसरली. सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पोलीस बॅंकेच्या शाखेत तळ ठोकून होते. कर्ज घोटाळ्याची विविध कागदपत्रांची माहिती बॅंक अधिकाऱ्यांकडून पोलीस घेत होते. यामुळे बॅंक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)