नगर बाजार समितीतील स्वच्छतागृहांची दूरवस्था

फरशा फुटलेल्या, दरवाजे तुटलेले : अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष

शेतकऱ्यांची होते कुचंबणा

नगर तालुक्‍यातून व जिल्हाभरातून अनेक शेतकरी व ग्रामस्थ दररोज बाजार समितीत येत असतात. मात्र स्वच्छतागृहाचे फलक नसल्याने त्यांची कुचंबणा होते. त्यामुळे जेथे जेथ मोकळी जाग दिसेत तेथेच अनेक जण लघुशंका करतात. त्यामुळे या मोकळ्या जागांना शौचालयाचे रूप आले आहे. त्यामुळे या परिसरातून येता-जाता नागरिकांना नाक मुठीत धरून चालावे लागते.बाहेरगावाहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या विश्रांतीची व विविध सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी बाजार समितीची असते. मात्र त्यालाच हरताळ फासला जात आहे.

नगर  – जिल्ह्यात सर्वांत मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नगर तालुका बाजार समितीच्या आवारता बांधलेल्या स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली असून, याकडे नगर बाजार समितीच्या पदाधिकारी वा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.

जिल्ह्यात अग्रगण्य म्हणून नावारुपाला आलेल्या नगर बाजार समिती आवारातील धान्य मार्केट, फूल मार्केट, भाजीपाला मार्केट परिसर व बाजार समितीने व्यावसायिकांसाठी बांधलेल्या तीन मजली इमारतीमधील अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांतील स्वच्छता रामभरोसे झालेली आहे. अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ बनलेली आहेत. स्वच्छतागृहांत कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. बाथरुमला दरवाजे नाहीत. अनेक दरवाजे तुटलेले आहत. फरशा फुटलेल्या आहेत, शौचालयाच्या काचा संपूर्ण फुटलेल्या आहेत. शौचालयात पाणी नाही, स्वच्छतागृहातील भांडे, पाईप गायब झालेले आहेत, विजेचीही सोय नाही.

बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. बाजार समिती परिसरातील व्यावसायिक तीन मजली इमारतीच्या जिन्यांमध्येच चहा विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे व्यवसाय कोणाच्या आशीर्वादाने चालू आहेत. धान्य बाजारामध्येही अनेकांनी काही पदाधिकारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरत अनधिकृत बांधकामे केलेली आहेत. या व्यावसायिकांना कोणाचे अभय आहे, त्यांनी कोणाची परवानगी घेतलेली आहे, हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत.

नगर बाजार समितीला दरवर्षी व्यावसायिक गाळेधारकांकडून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असताना या व्यावसायिक बांधवांना सायीसुविधा देणे गरजेचे आहे. त्याकडे मात्र प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. गाळेधारकांकडून लाखो रुपये बाजार समितीला उत्पन्न मिळत असताना इमारत दुरुस्तीवर लाखो रुपयांची उधळपट्टी दरवर्षी केली जाते. मात्र स्वच्छतागृहांमधील पाण्याचे पाईप, कॉक, दरवाजे तुटलेले असताना यावर किती खर्च झाला, याबाबत पदाधिकाऱ्यांनाच माहिती नाही

नगर बाजार समिती परिसरात शेतकरी निगडीत अनेक व्यावसायिक आहेत. धान्य बाजार, भाजीपाला, फळे, फुले, चारा याशिवाय बाजार समितीच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्‍स तीन मजली इमारतीमध्ये विविध प्रकारचे व्यावसायिक, शासकीय, निमशासकीय कार्यालये, राष्ट्रीयीकृत बॅंका, खासगी बॅंका, सहकारी बॅंका, पतसंस्था, जिल्हा फेडरेशन, करसल्लागार, राज्य सरकारची अनेक विभागाची कार्यालये या परिसरात असून, हजारो लोकांची वर्दळ असते. त्यांना स्वच्छतागृहाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहेत. याबाबत बाजार समितीच्या सभापतीसह कोणत्याही संचालकाचे, अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. व्यावसायिकांची व नागरिकांची स्वच्छता व अतिक्रमणामुळे गैरसोय होत आहे, याकडे पदाधिकारी, अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे अनेकांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)