आता लाटणे घेऊन धडा शिकवू : खा सुळे

अकोले - अकोले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसी संवाद साधताना खा.सुप्रिया सुळे.

‘प्राजक्ता’चा सवाल संसदेत मांडणार, खासदार सुप्रिया सुळे यांची ग्वाही

पवारांसाठी नाही तर जनतेसाठी रस्ता

जेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अकोल्यात येणार तेव्हाच बाजारतळ ते लेंडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले गेले. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण का केले नाही असा सवाल सुगाव खुर्द येथील अक्षदा वैद्य या विद्यार्थिनीने आ. वैभव पिचड यांना विचारला. त्यावर आ. पिचड म्हणाले, अकोल्यातील रस्त्यांचे व पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण व्हावे, यासाठी आम्ही सर्वत्र आवाज उठवला. निधी मिळविण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला. अजित पवार येणार म्हणून हा रास्ता डांबरीकरण केला नाही.तर जनतेच्या सोयीसाठी हा रस्ता डांबरीकरण केला असल्याचे आ. पिचड यांनी सांगितले.

अकोले – रावण कदम (आमदार राम कदम)झाले ते पुरे झाले. पहिली वेळ आहे, म्हणून आम्ही तुम्हाला सोडतो. मात्र येथून पुढे जर राज्यातील कोणत्याही पक्षाचा नेता अगर पुढारी असो, त्याने जर सावित्रीच्या लेकींविषयी अपशब्द काढले तर त्याचे पुढे काय परिणाम होतील, हे तुम्ही पाहतच रहा. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावत पुन्हा मुलींना पळविण्याची भाषा करणाऱ्याच्या मागे आम्ही महिला व मुली “लाटणे’ घेऊन त्यांच्या मागे लागू व त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रियाताई सुळे यांनी दिला.

-Ads-

अगस्ती महाविद्यालयाच्या बुवासाहेब नवले रंगमंचाच्या मैदानावर “जागर जाणीवांचा’ या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन युवक व युवतींना मार्गदर्शन करताना खा.सुळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. वैभवराव पिचड होते. यावेळी सीताराम गायकर, उत्कर्षा रुपवते, जे. डी. आंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी असंख्य युवक व युवतींनी सवाल विचारून खा. सुळे यांना चकित केले. त्यातील “सत्य बोला, नाही तर सत्ता सोडा’ हा प्राजक्ता तळेकर या युवतीचा प्रश्न आपण संसदेत पंतप्रधानांना विचारू असे त्यांनी जाहीर केले. जबाबदार नेत्याने व सुसंस्कृत व्यक्तीने असे भाष्य करणे योग्य नाही. कुणाला उचलून किंवा पळवून नेणार असे बोलणे कायद्याने तो अपहरणाचा गुन्हा होऊ शकतो. यास जबाबदार तो नेता नाही तर त्यास खऱ्या अर्थाने जबाबदार राज्याचा गुहमंत्री असतो. सध्याचा गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातील आ. कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी का पुढे आले नाही? त्या विषयावर मुख्यमंत्री व गृहमंत्री बोलत का नाही, असे सवाल करून ते फक्त सोशल मिडीया व ट्विटटरवर बोलण्यातच पटाईत असल्याची टीका त्यांनी केली. आपण त्यासाठी त्यांच्याशी जाहीर चर्चा करायला तयार आहे, असे खुले त्यांनी आव्हान दिले.

स्रियांवर दिवसेंदिवस अन्याय व अत्याचार कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी सुप्रियाताईंनी संसदेत आवाज उठवा अशी विनवणी प्राची देशमुख, प्रतीक्षा वाकचौरे, जानकी वैद्य, विशाल जाधव यांनी केली. योगेश शेळके, यश फरगडे, भारत सुर्वे, प्रज्ञा दातखिळे, अभिजित मंडलिक, प्राजक्ता तळेकर, प्रथमेश मंडलिक, प्रज्ञा घोलप, प्रशांत शेटे, यासह अनेक विद्यार्थ्यानी खा. सुळे यांना प्रश्न विचारले. त्यावर तुम्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन मी त्याविषयी नक्कीच संसदेत आवाज उठवील असे अभिवचन त्यांनी दिले.

मराठा समाजाने अनेक आंदोलने करून सुद्धा सध्याच्या युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. तर तुमचे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देणार का? असा सवाल शुभम खताळ या विद्यार्थ्याने विचारला असता, त्या म्हणाल्या, मराठा समाजाला आघाडी सरकारच्या काळात आरक्षण दिले. मात्र ते न्यायालयात गेले. ते युती सरकारने म्हणावा असे हाताळले नाही. त्यामुळे ते रेंगाळले. मात्र 2019 मध्ये आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण नक्कीच मिळून देणार असे अभिवचन त्यांनी दिले.

महेंद्र धोनीसारख्या क्रिकेटरला लाखो रुपयांची बक्षिसे दिली जातात. मात्र जो शेतकरी आपल्या शेतात राबराब राबतो. त्याच्या मालाला मात्र हमीभाव मिळत नसल्यामुळे तो आत्महत्या करतो. याकडे का लक्ष दिले जात नाही? अशी खंत प्रज्ञा तळेकर या विद्यार्थिनीने व्यक्त केली. त्यावर खा.सुळे म्हणाल्या, आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नक्कीच देणार आहे. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य भास्कर शेळके यांनी तर सुत्रसंचालन प्रा.संदेश कासार व प्रा. बाळासाहेब शेटे यांनी केले. आभार उपप्राचार्य डॉ. सुनील शिंदे यांनी मांडले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)