आ. पिचडांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित

चर्चेतून तीन शिक्षक देण्याचे लेखी आश्‍वासन

अकोले – अकोलेतील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेला चार शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेले उपोषण आमदार वैभवराव पिचड यांच्या मध्यस्थीनंतर स्थगित करण्यात आले. मंगळवारी पालकांसह नागरिक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.

आ. पिचड यांनी मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, तहसीलदार, यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी या शाळेस तीन शिक्षक देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. अकोले शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत 1 ते 8 वीपर्यंत वर्ग आहे.या शाळेत पटसंख्येनुसार चार शिक्षक होते.परंतू ऑनलाईन बदल्यामध्ये या चारही शिक्षकाच्या बदल्या झाल्या. बदलीने केवळ एक शिक्षिका या शाळेस आली. यामुळे 1 ते 8 वर्गाना केवळ एकच शिक्षिका असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हेळसांड सुरु झाली. याप्रश्‍नांकडे पालक, विद्यार्थी व नागरिकांनी शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून अन्य शिक्षकांची मागणी केली.

निवेदन दिल्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्याने पालकांनी 1 ऑगस्टला शाळेला टाळे ठोकले. शाळा बंद आंदोलन केले होते. यानंतरही प्रशासनाची उदासीनता दिसून आल्याने व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे होत असलेले नुकसान टाळावे, म्हणून मंगळवारी पालक व नागरिकांनी शाळेला चार शिक्षक मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरु केले होते.

या उपोषणास शेतकरी सुकाणू समिती सदस्य व शेतकरी नेते डॉ. अजित नवले, शिवसेना शहराध्यक्ष नितीन नाईकवाडी, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, युवक कॉंग्रेसचे निखील जगताप, विश्वास आरोटे, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदीप कडलग, राष्ट्रवादीचे मीनानाथ पांडे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी पाठिंबा देवून नगरला शिक्षणाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे आश्‍वासन दिले.

आ. पिचड यांनी मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात तहसीलदार मुकेश कांबळे यांची भेट घेतली. यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक उपस्थित होते. आ. पिचड यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करुन कोणत्याही परिस्थितीत उर्दू शाळेला शिक्षक देण्याची मागणी करुन उपोषणकर्त्याचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यानंतर चर्चेतून तीन शिक्षक देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, नगराध्यक्षा संगीताताई शेटे, ज्येष्ठ नेते कारखाना संचालक मीनानाथ पांडे, संचालक सुनील दातीर, कचरू शेटे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, विक्रम नवले, भूषण आवारी, उपोषणकर्ते ज्येष्ठ नेते हमिदभाई फारूखी, अकोले एज्युकेशन संचालक आरीफ तांबोळी, बाजार समितीचे संचालक दिलावर शेख, अर्षद तांबोळी, मन्सूर सय्यद, अन्सार पटेल, हाजी मुश्‍ताक तांबोळी, आयाज शेख, मौलाना मौजूद, हुसेन मन्सूरी, हसिन पठाण, गफ्फार कुरैशी, मुश्‍ताक शेख उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)