‘अगस्ती’च्या सभेत शिवसेना-भाजपमध्ये जुगलबंदी

-प्रा.डी.के.वैद्य

पिचडांचा हस्तक्षेपामुळे भाजपचा सभात्याग : ही काय झेडपीची सभा आहे का पिचडांचा सवाल

अकोले- सभा अगस्ती सहकारी साखर कारखान्याची. मात्र जुगलबंदी रंगली शिवसेना व भाजपमध्ये. त्यामुळे एकीकडे शांततेत सभा पार पडताना भाजप व शिवसेनेतील मतभेदाची दरी रुंदावली. माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी हस्तक्षेप केला.त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीने भाजप गटाचा सभात्याग ही राजकीय रंगबाजी सभास्थळी चर्चेचा विषय बनली.

अगस्ती सहकारी सहकारी साखर कारखाना सर्वपक्षीय संचालक मंडळाकडून चालवला जात आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना व शेतकरी संघटनेचा सहभाग आहे. या सभेत खरे तर ऊस उत्पादक सभासदाने बोलावे असे अभिप्रेत असते. मात्र अकोलेचे पक्षीय राजकारण कारखान्याच्या सहकारात जसे नाही तसेच ते अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण वर्तुळात नाही.

सभा 1 वाजता सुरु झाली.विशेष बाब म्हणजे सभेपुढील 2 ते 8 क्रमांकाचे विषय अवघ्या 5 मिनिटात एक मताने मंजूर झाले. मात्र अहवाल वाचनात जे मान्यवर सहभागी झाले. ते तब्बल 16 जण होते. त्यात किमान साडेतीन ते चार तास गेले. प्रसिद्धीसाठी जे बोलले ते बोलले. मात्र जि.प.सदस्य जालिंदर वाकचौरे हे कारखान्याचे सभासद नाहीत. तरी पिचड यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली.तेव्हा शिवसेनेचे नेते व खंडेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष प्रदीप हासे बोलण्यासाठी आले. तेव्हा माईक वाकचौरे यांनी घेतला. त्यांनी हासे यांना तू बोलू नको. असा मैत्रीपूर्ण आग्रह धरला. मात्र पूर्वीचे मतभेद तेथे उघड झाले. आणि त्या दोघात शाब्दिक चकमक उडाली.

हासे यांनीही वाकचौरे यांच्या हातातील माईक घेण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा पिचड यांनी वाकचौरे यांना संधी दिली. नंतर हासे यांनी बोलावे असा आग्रह धरला. वाकचौरे यांनी विकास कामे मार्गी लावावीत असे आग्रही मत मांडताना कारखाना कार्यकारी संचालक भास्कर घुले यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांच्या खासगी कामावर कारखाना कर्मचारी का आहेत. शिवाय एका महिन्यात त्यांच्या चारचाकीचे इंधन 99 हजार रुपयांचे कसे अशी विचारणा केली. त्याने सभेला वेगळे वळण मिळाले.

पिचड यांनी माईक हातात घेवून वाकचौरे यांचे भाषण बंद केले. त्यातून रागावलेल्या रमेश राक्षे, वाल्मिक नवले, भाऊसाहेब आभाळे आदी सहकाऱ्यांनी सभात्याग केला. पिचड यांचा गैर व्यवहार उजेडात येईल म्हणून आम्हाला बोलू दिले नाही, असा आरोप करणारे निवेदन प्रसिद्धीला दिले. त्यानंतर पिचड म्हणाले, राजकारण सहकारात आम्ही केले नाही. उलट सभासद नसताना बोलू दिले जाणारा हा कारखाना आहे. ज्यांनी पिठाची गिरणी उभी केली नाही. त्यांनी मला सल्ला देवू नये. सार्वत्रिक निवडणुकात समोरासमोर लढा, असा वाकचौरे यांना सल्ला दिला.

घुले यांची भलामण करताना पिचड म्हणाले की, बेताल आरोप करण्याऐवजी त्यांनी न्यायालयात जावे. मात्र आम्ही घुले यांचे 24 तास कारखान्याला योगदान मिळत असल्याने त्याच्या मागे सर्व संचालक व शेतकरी सभासद आहोत असे जाहीर केले. ही जिल्हा परिषदेची सभा नाही, असा टोला लगावून पिचड यांनी सवलत दिली म्हणजे काहीही बोलू नये, असे सुनावून यापुढे असा प्रकार आपण खपवून घेणार नाही. असा इशारा दिला. प्रदीप हासे यांनी शिवसेनेचे दोन संचालक मंडळात आहेत. आम्हाला सहकारात राजकारण करावयाचे नाही, असे सांगून वाकचौरे यांच्या हस्तक्षेपबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)