निळवंडे कालव्याच्या नोटिसांनी शेतकरी वर्गात अस्वस्थता

संग्रहित छायाचित्र..

अकोले  – निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्यांची कामे अकोले तालुक्‍यात सुरू करण्याच्यादृष्टीने कालवे खोदाईच्या नोटिसा दिल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. पाटबंधारे विभागाने अकोले तालुक्‍यात मुख्य कालव्यांच्या खोदाईसाठी हालचाली सुरू केल्याने व त्यासाठी संपादन केलेल्या जमीन मालकांना 14 नोव्हेंबर रोजी नोटिसा दिल्या आहेत. या खोदाई कामात अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा या विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.

14 नोव्हेंबर रोजी सहायक कार्यकारी अधिकारी उपविभाग क्रमांक पाच यांनी या नोटिसा शेतकऱ्यांना बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 14 ऑगस्ट 1984 रोजी शासनाने निळवंडे धरणाच्या मुख्य कालव्याच्या कामासाठी जमीन संपादित केली. अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना या नोटिसा बजावण्यात आले आहेत.

यात स्पष्टपणे म्हटले आहे की, उजवा व डाव्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रावर कालव्यांची कामे सुरू करावयाची असल्याने संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रातील व इतर मालमत्ता त्वरित स्वतःहून काढून घ्यावीत. तसेच कालव्याच्या कामासाठी अडथळा आणू नये, अन्यथा आपल्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याची कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिशीत नमूद केल्याने शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थतेची भावना पसरली आहे.

निळवंडेच्या मुख्य डाव्या कालव्यांसाठी म्हाळादेवी, मेहेंदुरी, बहिरवाडी, ढोकरी, अंबिकानगर, टाकळी, खानापूर, गर्दनी, कळस खुर्द या गावातील जमिनी यासाठी संपादित केल्या गेलेल्या आहेत. तर उजव्या बाजूच्या मुख्य कालव्याच्यासाठी रुंभोडी, इंदोरी, धुमाळवाडी, कळस बुद्रुक या गावातील क्षेत्र संपादित केले गेले आहे.

या सर्व गावांमध्ये बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे व शेतकऱ्यांचेही प्रमाण मोठे असल्याने या जमिनी जाण्याने बहुतेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा या कालव्यांना विरोध असून, हे कालवे बंदिस्त पाईपद्वारे सुरू करावेत, अशी त्यांची मागणी आहे.

यासाठी विविध पक्ष, संघटना यांनी सरकार विरोधात आंदोलने केलेली आहेत. मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनीही या उघड्या कालव्यांना विरोध केलेला आहे. तर माकपचे नेते डॉ. अजित नवले, शेतकरी संघटनेचे नेते अशोकराव आरोटे त्याचबरोबर शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी विरोध केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)