भाजपच्या राजकारणामुळेच अकोलेस दुष्काळातून वगळले : आ. वैभव पिचड

पूर्वसूचना न देता तीव्र आंदलन करण्याचा दिला इशारा : तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

अकोले  – भाजपा सरकार हे राजकीय सुडातून अकोले तालुक्‍यावर अन्याय करीत आहे. अकोले तालुक्‍यात तत्काळ दुष्काळ जाहीर करुन जायकवाडीसाठी धरणातून सोडलेले पाणी त्वरीत थांबविण्यात यावे, शेतीसाठी पूर्णदाबाने 11 तास सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागण्यांसाठीचे हे अंतिम आंदोलन असून, उद्यापासून तालुक्‍यात कोणतेही निवेदन व पूर्वसूचना न देता उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा आ. वैभवराव पिचड यांनी दिला.

-Ads-

अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी त्वरीत थांबविण्यात यावे, शेतीसाठी पूर्णदाबाने व अखंडीत 11 तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागण्यांसाठी आज तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अधिकाऱ्यांशी बोलतांना आ. पिचड यांनी हा इशारा दिला.

या प्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव नवले, कृ. उ. बा. सभापती पर्बतराव नाईकवाडी, ए. टी. एस. अध्यक्ष जे.डी. आंबरे , पक्षाचे तालुका सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, माजी नगराध्यक्ष ऍड. के. डी. धुमाळ, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नंदाताई धुमाळ, युवक तालुकाध्यक्ष शंभू नेहे, अंजनाताई बोंबले, राहुल देशमुख, विजय पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाच्यावतीने तहसीलदार मुकेश कांबळे, जलसंपदाचे शाखा अभियंता रामनाथ आरोटे, महावितरणचे उपअभियंता ज्ञानेश बागूल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आ. पिचड यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत पालकमंत्री व प्रांताधिकाऱ्यांनी प्रवरा नदीवरील उपोषण सोडतेवेळी वीजपुरवठ्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? तालुक्‍यात दुष्काळ जाहीर नसल्याने भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू करावे लागणार आहेत.

पुढील सर्व आवर्तन निळवंडेतून दिले जाणार असल्याने निळवंडे उच्चस्तरीय कालव्यांना पाणी मिळणार नाही. एकूणच सरकारने तालुक्‍यात काही भागात पिण्याच्या पाण्याचा तर काही भागात शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण केला आहे, असा आरोप आ. पिचड यांनी केला. यावेळी आंदोलकांतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आले.

या प्रश्‍नावर तालुक्‍यामध्ये सत्ताधिकारी भाजप-शिवसेना सोडून इतर सर्व पक्षांनी आंदोलन हाती घेतले. पालकमंत्र्यांनी तालुका दुष्काळी करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेतो, असे सांगितले. मात्र बैठक न घेता तालुक्‍यातील जनतेची घोर फसवणूक केली गेली आहे. दुष्काळही जाहीर केला नाही व पाणीही सोडण्यात आले. अकोले तालुक्‍यातील अधिकाऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम भाजप व शिवसेना सरकारने केले.

सध्याचे सरकार अवणी वाघीण, पुतळे, स्मारके, मंदिरे, शहरांचे नामांतर याच विषयांमध्ये गुरफटले आहे. दुष्काळावर चर्चा करायला यांना वेळ नाही. रस्ते, पाणी, वीज, रोजगार या मूलभूत प्रश्‍नांकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करुन भावनिक मुद्‌द्‌यांवर ध्रुवीकरण करण्याचा भाजप-शिवसेना प्रयत्न करत आहे. राज्यात शेतकरी दुष्काळ व कर्जबारीपणामुळे स्वतःची चिता रचून आत्महत्या करीत आहेत. मात्र याबाबत सरकारला कुठलेही गांर्भीय नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास हासे, सुनील दातीर, राजेंद्र डावरे, गोरख मालुंजकर, नगरसेवक नामदेव पिचड,अनिल देशमुख, राहुल बेणके, मुरलीधर ढोन्नर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)