‘…तर अकोल्यातील आंदोलन सुरूच राहणार’

तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी

अकोले – राज्य सरकारवर आमचा विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत आकोले तालुका दुष्काळी जाहीर होत नाही, तोपर्यंत अगस्ती पुलावर सुरू असलेले ठिय्या आंदोलन सुरूच राहील, अशी माहिती आ. वैभवराव पिचड यांनी दिली. तसेच अकोले, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत अंतर्भाव व्हावा, यासाठी संसदेत शून्य प्रहरात प्रश्‍न उपस्थित करू, असे आश्‍वास खा. सदाशिव लोखंडे यांनी दिले. तसेच पाणी आवर्तनाच्या लढ्याचे आ. पिचड यांचे नेतृत्व आपण मान्य केले आहे. एक सामान्य शेतकरी म्हणून यापुढेही या लढ्यात सहभागी राहील, असेही त्यांनी जाहीर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज (दि.29) दुपारी अकोले बाजार तळावर सर्व पक्षीय पाणी कृती समितीतर्फे बैठक घेण्यात आली. त्यानंतर एक वाजताआंदोलक विविध घोषणा देत प्रवरा नदीवरील अगस्ती पुलावर गेले. तेथे सभा झाली. यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार मुकेश कांबळे, जल संपदाचे उपविभागीय अधिकारी रामनाथ आरोटे, पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सभेनंतर प्रांताधिकारी डोईफोडे यांनी महसूलमंत्र्यांना अकोले तालुका दुष्काळी व्हावा, असे कळवले आहे. त्यामुळे हा निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घ्यावे, असे सांगितले. त्यास तीव्र विरोध दर्शवताना आ. पिचड, डॉ. अजित नवले, मधुकरराव नवले, महेश नवले, मीनानाथ पांडे आदींनी विरोध केला.

तत्पूर्वी जाहीर सभेत बोलताना आ. पिचड यांनी अकोले तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागणीसाठी विधिमंडळात आवाज उठवू, असे जाहीर केले. प्रशासनाने बाळाचा वापर करून आंदोलन दडपले, तर ते हिंसक वळण घेईल. मागणी पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील, असे आ. पिचड यांनी सांगितले. खा. लोखंडे यांनी ही राजकीय नव्हे, तर सामाजिक व अन्यायाविरोधाची लढाई आहे, असे सांगितले.

डॉ. अजित नवले, मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, मच्छिंद्र धुमाळ, शांताराम वाळुंज, विनय सावंत, गिरजाजी जाधव, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, महेश नवले, डॉ संदीप कडलग, आरपीआयचे विजयराव वाकचौरे, अशोक देशमुख संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपाचे शिवाजी धुमाळ यांनी अकोले, संगमनेर, शिर्डी व कोपरगावसाठी जर निळवंडे धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाणार असेल, तर निळवंडे धरणाचे कालवेच रद्द करा, अशी मागणी केली. बुधवारच्या (दि. 31) मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

उत्कर्षा रुपवते, माजी पंचायत समिती सभापती अंजनाबाई बोंबले, उपसभापती मारुती मेंगाळ, विलास आरोटे, विकास शेटे, निखील जगताप आदींची यावेळेस भाषणे झाली. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते कारभारी उगले, आर. डी. चौधरी, कैलासराव वाकचौरे, माधव तिटमे, कल्पनाताई सुरपुरिया, शंभू नेहे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)