काळभैरव जयंतीनिमित्त अकोलेत दीपोत्सव

अकोले - शहरातील काळभैरवनाथ मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

अकोले – अकोले शहरातील प्राचीन काळभैरवनाथ मंदिरात कालभैरवनाथ जयंतीनिमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शहरातील प्रवरा नदीच्या कडेला प्राचीन सिद्धेश्वर मंदिर असून, येथेच काळभैरवाचेही स्वतंत्र मंदिर आहे. कालभैरव जयंतीनिमित्ताने इथे दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. याही वर्षी पहाटेपासूनच भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती.

पहाटे जलाभिषेक व महाआरती करण्यात आली. बाजरीची भाकरी व वांग्याचे भरीत, असा भाविकांनी देवाला नैवेद्य दाखविला. भाविकांनी कालभैरवाष्टकाचे सामूहिक पठण केले. बटुकभैरव कवचाचेही पठण भाविक करीत होते. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

-Ads-

स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींनी उत्सवात मोठ्या हिरिरीने भाग घेत विविध धार्मिक कार्यक्रम सादर केले. या मंदिरात शनी महाराज व शीतलादेवी यांचेही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. सिद्धेश्वर मंदिरातही भाविकांनी शिवलीलामृताचे पठण केले. सायंकाळी आरती नंतर पणत्या लावून दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी असंख्य दिव्यांनी हा परिसर उजळून निघाला होता. मदनराव पेटकर यांच्या हस्ते पणती पेटवून दीपोत्सवास प्रारंभ करण्यात आला. दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पेटकर, प्रशांत कोळपकर, पुजारी सोपानराव अगस्ते, योगेश अगस्ते, संगीता वलवे, बापू मंडलिक, सोन्याबापू मंडलिक, संगीता मंडलीक आदींनी परिश्रम घेतले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)