आढळातून संगमनेरला पाणी देण्यास विरोध

परिसरात दुष्काळ जाहिर करण्याचे तहसीलदारांना निवेदन

अकोले – आढळा धरणातून संगमनेर तालुक्‍यात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना करण्यास विरोध दर्शवला आहे. ही योजना होऊ नये. तसेच बिताका प्रकल्पाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे व आढळा विभागात पाऊस न झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, या मागण्याचे निवेदन आढळा भागातील नागरिकांनी आज सकाळी तहसीलदारांना दिले.

याबाबत आढळा विभागातील कार्यकर्त्यांनी सकाळी तहसीलदार मुकेश कांबळे यांना मागण्याचे निवेदन दिले.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, अगस्ती कारखाना संचालक सुनील दातीर, पंचायत समितीच्या माजी सभापती अंजनाताई बोंबले, माजी सदस्य अरुण शेळके, अब्दुल इनामदार उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात आढळा धरण हे छोटे धरण आहे. दुष्काळामुळे हे धरण भरलेले नाही. त्यामुळे या धरणातील पाण्याने अत्यल्प प्रमाणात लाभक्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यात संगमनेर तालुक्‍यातील काही गावांची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना या धरणातून प्रस्तावित आहे. ही योजना झाली तर याचा मोठा फटका आढळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बसणार आहे. सिंचनाचे लाभक्षेत्र कमी करणार असा प्रश्‍न आहे.त्यात यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता या धरणातून केवळ 4 महिनेच लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे. त्या पुढील चार महिने पाण्याचा महाभयंकर दुष्काळ सहन करावा लागणार आहे.तेव्हा ही प्रादेशिक नळयोजना आढळा धरणातून करता इतर पर्यायांचा विचार करावा,असे निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी बिताका व एकदरा येथून पश्‍चिमेकडे वाहून जाणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे वळवून आढळा नदीमध्ये आणण्याची योजना मंजूर करुन आदिवासी विभागाकडून निधी दिला होता. काम वनविभाग व स्थानिकस्तर विभागांतर्गत सुरु होऊन 50 टक्‍के काम पूर्णही झाले होते. त्यामुळे काही वर्षे आढळा धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली होती. परंतु त्यानंतर सरकार बदलले भाजप सरकार सत्तेवर आले. या सरकारने या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यात तालुक्‍यातील भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाची तक्रार सरकारकडे करुन या प्रकल्पाविषयी गैरसमज केला.

वास्तविक हे काम मातीचे खोदकाम असल्याने वनखात्याचे योजना एकत्र करुन तत्कालिन अधिकाऱ्यांनी चर खोदून घेतले. त्यात अतिवृष्टी झाल्याने चरामध्ये माती ढासळली व पाण्याचा प्रवाह बंद झाला. या चरामध्ये साचलेली माती उकरून मंजूर प्रकल्पाची अपूर्ण कामे पूर्ण करावे. यासाठीचा एक कोटी रूपयांचा वनविभागाकडे पडून आहे, तरी तातडीने बिताका प्रकल्पाचे काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर्षी आढळा परिसरात पुरेसा पाऊस झालेला नाही.या भागातील गणोरे, खिरविरे, एकदरा व डोंगरगाव या परिसरात अतिशय कमी पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यांचाही मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे.यामुळे याविभागातील शेतकरी मेटाकुळीस आला आहे. शासनाने या आढळा विभागात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)