आढळाच्या उजव्या, डाव्या कालव्यांची पाहणी

file pic

पाणी चोरी करणाऱ्यांना लावला चाप : पाण्याची चोरी केल्यास कारवाईचा इशारा

अकोले – आढळा आवर्तन काळात कालव्यांमधून पाणीचोरी करणारांची गय केली जाणार नाही, असा इशारा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिला आहे. या विभागाकडून पाणीचोरांविरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आढळा धरणातून 29 नोव्हेंबर रोजी आवर्तनाला सुरुवात झाली. मात्र अनेकांनी आवर्तन पाणी येण्यापूर्वीच पाईप टाकून पाणीचोरीची पद्धतशीर व्यवस्था केली होती. ही बाब ध्यानी घेऊन जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता रामनाथ आरोटे, संगमनेरचे उपविभागीय अभियंता गणेश हारदे, गणोरे शाखा अभियंता ए. डी.पवार, चिकणी शाखा अभियंता आर. बी. कवडे या अधिकाऱ्यांनी ही पाहणी मोहीम राबविली.

उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे साधारण शंभरपेक्षा अधिक शेतकऱ्यांची पाणीचोरी करण्याची तयारी अधिकाऱ्यांनी हाणून पाडली. यावर्षी 1060 दलघफू पाणी साठवण क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरलेच नाही. धरणात अवघा 641 दलघफू पाणीसाठा झाला. पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तरीही या तुटपुंज्या पाण्यात कसेबसे एक आवर्तन लाभक्षेत्राला देण्याचा मानस बाळगून मैदानात उतरलेल्या अकोले तालुक्‍यातील देवठाण येथील आढळा धरणावर नियंत्रण करणाऱ्या जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना आता पाणीचोरांचाही सामना करावा लागत आहे.

यासाठीची धडक पाहणी मोहीम जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी राबवली. लाभक्षेत्रातील कालवे आणि चाऱ्यांची पाहणी करताना पाणीवहनात येणारे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांच्या ही पाणीचोरी लक्षात आली.

लाभक्षेत्रातील मागणी केलेल्या शेतकऱ्यांना नियमाने सिंचन होण्यासाठी जलसंपदाने एकरी तीन तास व जास्तीत जास्त तीन एकरला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. हे नियोजन यशस्वी होण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यात अनेक शेतकऱ्यांनी पाणीचोरी करुन गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाण्याची अवैध चोरी करण्याचा सपाटाच सुरू केला आहे, असे पुढे आले आहे.

या मोहिमेमुळे चोरून पाणी घेणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पाणीचोरी आढळून आल्यास जलसंपदाच्या अधिकाऱ्यांना कळवावे. सांगणाराचे नाव गोपनीय ठेवून पाणी चोरणारांवर कडक कारवाई करू, असा इशारा जलसंपदा खात्याने दिला आहे.

आढळेचा आजचा साठा 400 दलघफू असून, 1 हजार 265 हेक्‍टरपैकी आजपर्यंत दोन्ही कालव्यांद्वारे 290 हेक्‍टर क्षेत्र सिंचित झाले आहे. उर्वरित मागणी क्षेत्राचे सिंचन करण्यासाठी लाभधारकांनी सहकार्य करावे. आतापर्यंत सहनशीलता ठेवली. पण यापुढे मात्र आवर्तनकाळात पाणीचोरी आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई करू. पाणीचोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे, हे पाणीचोरी करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे, असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)