कोकणकड्यावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुखरूप सुटका

मदत पथकानी राबवली हरिश्‍चंद्रगड ते कोकणकडा शोध मोहीम

अकोले – शोध व मदत पथकांच्या चौफेर मदतीमुळे हरिश्‍चंद्रगडाच्या कोकणकड्यावर अडकलेल्या 17 हौशी ट्रेकर्सची सोमवारी दुपारी चार वाजता सुखरुप सुटका झाली.  कल्याण येथील डॉ. हितेश अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण आणि औरंगाबाद येथील रॅपलिंगमध्ये 13 पुरुष व 4 महिला, अशा 17 ट्रेकर्सना घेऊन ट्रॅकिंग व रॅपलिंगसाठी हरिश्‍चंद्रगड या ठिकाणी रविवारी (दि.25) आले होते. हरिश्‍चंद्र येथील स्थानिक गाईड निवृत्ती याचा रॅपलिंग करीत असताना अचानक मधमाशांच्या मोहळाला धक्का लागला. त्यामुळे साराच गोंधळ उडाला. सर्व ट्रेकर्स सैरभैर झाले.

त्यात सायंकाळी पडत चाललेला अंधार आणि उठलेल्या मधमाशा यामुळे सर्व ट्रेकर्स बचावासाठी कड्याच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आश्रयाला गेले. अंधार जास्त झाल्याने मधमाशांपासून त्यांची सुटका झाली खरी. मात्र सैरभैर झाल्यामुळे सर्व ट्रेकर्सना तेथून निघणे शक्‍य झाले नाही.

ट्रेकर्सना सेटअपचेंज करण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांना त्यांच्या मोहिमेचा हेतू बाजूला सारून रात्र कड्याच्या मध्यभागी काढावी लागली. सायंकाळी दोन टीमने संयुक्तीक रॅपलिंग करण्यास सुरुवात केली होती. हरिश्‍चंद्रगड कोकणकडा येथे पायथ्याशी गडापासून दीड किलोमीटर अंतरावर एक हजार फूट खाली दरी असून, हे सर्व ट्रेकर्स त्याठिकाणी अडकले होते. कोकणकड्यापासून खाली 800 फूट अंतरावर गेल्यानंतर अंधार झाल्याने व परिसरात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे सर्व ट्रेकर्स त्याच ठिकाणी थांबून होते. त्यांच्या सोबत राज पारकर व अस्लम मोतीवाला हे अनुभवी ‘ग्रुप लीडर’ देखील होते. त्यांनी सर्व ट्रेकर्सना अन्न व पाण्याची व्यवस्था केली.

चार युवतींमध्ये ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश होता. त्यांनी 100 क्रमांकावर कळवले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू झाले. अकोले, मुरबाड व अन्य प्रशासकीय यंत्रणांनी रात्रभर जागून ही शोध व सुटका मोहीम राबवली.

पुण्यातील एनडीआरएफच्या टीमबरोबरच, कल्याणच्या शिवगर्जना, नाशिकच्या वैनतेय व लोणावळ्यातील शिवदुर्गच्या जवानांनी व स्थानिक आदिवासींनी मदत केली. आज सोमवारी (दि. 26) भल्या पहाटे हरिश्‍चंद्रगड ते कोकणकडा अशी शोध मोहीम राबवून अंधारात वाट न सापडणाऱ्या या 17 ट्रेकर्सना दुपारी चाल वाजेच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले.

याबाबत अकोलेचे तहशीलदार मुकेश कांबळे व राजूर पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांनी सर्व ट्रेकर्सना पायथ्याशी सुखरूप आणले. आता कुणीही कोकणाकड्यावर अडकलेले नसून, सर्व ट्रेकर्स सुरक्षित आहेत, असे सांगून जनतेने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)