खाऊच्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांना कपडे व साहित्य

कळस बुद्रक झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांकडून वंचितांची दिवाळी साजरी

अकोले -“हीच अमुची प्रार्थना । अन्‌ हेच अमुचे मागणे ।। माणसाने माणसाशी । माणसासम वागणे ।।’ ही प्रार्थना या शाळेत मुले परिपाठात म्हणतात. प्रार्थना आशय कळण्याचे त्यांचे वय नाही. पण त्या आशयाला गवसणी घालणारे कल्पक काम शिक्षकाने केले, तर वंचितांची गोड दिवाळीचे स्वप्न साकारले जाणारा प्रसंग पथदर्शी व मार्गदर्शक म्हणून पहावा असाच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले तालुक्‍यातील कळस बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहावीच्या मुलांनी आगळी वेगळी दिवाळी साजरी केलेली ती म्हणजे वंचितांची दिवाळी होय. वर्गातील मुलांनी दिवाळीच्या खाऊच्या पैशातून आपल्या वर्गातीलच गरीब मुलीला नवीन ड्रेस घेतला. तिने तो परिधान केला. आणि ती हसली, तेव्हा वंचितांच्या दिवाळीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही खुलला.

“माणसाने माणसाशी माणसासम वागणे.’ या उपक्रमामध्ये मुलांनी वाचविलेले पैशातून दिवाळीसाठी बनविलेल्या “संचयनी डब्यात’ जमा केले. प्रत्येक वर्गात एक गरजू विद्यार्थी निवडून, ज्याला खरेच गरज आहे. असा विद्यार्थी निवडण्यात आला. या डब्यात गेल्या 15 दिवसात जमविलेल्या पैशातून काही मुलांनी आपल्याच वर्गातील गरजू विद्यार्थ्यांला शालेय साहित्य आणले. काहींनी दिवाळीसाठी सुवासिक वासाचे तेल, फेस पावडर, अंगाचा साबण अशा वस्तू आणल्या. काही वर्गातील मुलांनी शैक्षणिक साहित्य आणून भेट दिले.

पहिली ते सातवीचे वर्ग असणाऱ्या शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी साक्षी बुधा उघडे या गरीब, गरजू व मदतीची गरज असणाऱ्या विद्यार्थिनीची संचयनी पैशाच्यासाठी निवड केली. साक्षी ही विद्यार्थिनी अबोल, शांत व कुणाशीही वैर नसलेली, अभ्यासात जेमतेम असलेली. घरात आई वडील दोघेही अपंग. शेती वाट्याने काम करून व मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कुटुंब. शाळेत रंगीत ड्रेस घालण्याचा दिवस असला तरीही साक्षी शाळेचे कपडे घालून येणारी.

या साक्षीच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी विद्यार्थी गेले 15 दिवस धडपड करत होते. कोणी एक रुपया, कोणी दोन रुपये बचत करत होता. मुलांनी अशी बचत केली. साक्षीसाठी नवा ड्रेस आणला. आणि दिवाळीसाठी तिला वर्गशिक्षिका स्मिता धनवटे यांच्या हस्ते साक्षीला दिला. तेव्हा साक्षीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू आले. ही भेट म्हणजे एका भावाने अथवा बहिणीने आपल्या बहिणीला दिलेली दिवाळीची भेट होती.

या उपक्रमातून मुलांना आपण जीवन कसे जगले पाहिजे?आपला आनंद दुसऱ्याला देण्यातूनही कसा मिळतो? मदत करण्याची भावना, सहकार्य, परस्पर प्रेम, आपुलकी हे गुण यातून त्यांच्यात रुजले. ही मुले रोज परिपाठात म्हटली जाणारी प्रार्थना खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. “हीच अमुची प्रार्थना ।अन हेच अमुचे मागणे । माणसाने माणसाशी माणसासम वागणे।’ खऱ्या अर्थाने ही प्रार्थना मुलांनी सार्थ करून दाखवली.

आज मुले आभासी दुनियेत भरकटत चालले आहेत. असे छोटे छोटे उपक्रम राबवून त्यांच्यात माणूसपण जागविण्याची गरज आहे. या उपक्रमासाठी इयत्ता सहावीच्या वर्गशिक्षिका स्मिता धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक दिघे व सर्व शिक्षक वृंद यांनी सक्रिय पाठिंबा देऊन उपक्रम यशस्वी करून दाखवला. यासाठी ग्रामस्थांनी शालेय शिक्षकांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)