‘फेकू,’ जुलमी सरकारला पायउतार करा

अजित पवार यांचे आवाहन; अकोल्यात शेतकरी मेळावा

अकोले – केंद्रात व राज्यात असलेल्या भाजपच्या सरकारला सत्तेचा माज आला आहे. हुकूमशाही प्रवृत्तीचे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून सत्तेवर आलेले हे सरकार त्यांनाच उद्‌ध्वस्त करीत आहे. “फेकू’ व “चुनावी जुमला’ करणाऱ्या सरकारांना पायउतार करण्यासाठी जनतेने कटिबद्ध व्हावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड होते. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ धूत, राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, आशाताई पापळ, संगीता शेटे आदी उपस्थित होते. नवले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या किसान सभेचे प्रांतिक उपाध्यक्ष नियुक्तीचे पत्र पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

पवार पुढे म्हणाले, की राज्य सरकारने जनतेवर 5 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. मनू हा संत ज्ञानेश्‍वर व संत तुकारामोंपक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हणणाऱ्या संभाजी भिडेंना ठेचून काढले पाहिजे. दाभोलकर, पानसरेंची हत्या का झाली? याचे मास्टर माइंड कोण आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. महावितरणचा गलथान कारभार हेच तर या सरकारचे “अच्छे दिन’ आहेत, असा टोला लगावून महिलांविषयी आदर नसलेल्या या सरकारला धडा शिकवावा लागेल. सद्दाम हुसेनचा शेवट तुम्ही पाहिला. आता राज्य सरकारची हुकूमशाही महाराष्ट्र सहन करणार नाही.

शिंदे यांनी मधुकरराव पिचड यांच्या कामाचा गौरव केला. आ. वैभवराव पिचड यांना विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात तालुक्‍याच्या विविध प्रश्‍नांवर भांडतांना आम्ही पाहिले आहे. मधुकरराव पिचड यांनी आपली ओळख देशात निर्माण केली. सध्याचे आदिवासी मंत्री सावरा यांनाच सावरण्याची वेळ आली आहे. पटसंख्येअभावी आश्रमशाळा बंद होत आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे सायकलवर जाण्याची वेळ आली आहे. अशा या नादान सरकारला घरी पाठविण्यासाठी राष्ट्रवादीच्या हाती सत्ता द्यावी.

आ. पिचड यांनी भाजप सरकारच्या हुकूमशाही व जुलूमशाहीला वाचा फोडण्यासाठी हा शेतकरी मेळावा घेतला असल्याचे सांगितले. निळवंडे धरणाचे मुख्य कालवे बंद पाईपलाईनद्वारे नेण्यासाठी अजितदादांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. हे धरण भरण्यासाठी बिताक्‍याचा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. वनविभागाकडे एक कोटी रुपये निधी शिल्लक असताना येथील कार्यकर्ते हा प्रकल्प पूर्ण होवू देत नाही. यासाठी अजितदादांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.
या वेळी मीनानाथ पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रास्ताविक केले. यशवंतराव आभाळे यांनी सूत्रसंचालन केले.

संसारी माणसाचे दुःख मोदी यांना कसे कळणार?

“मला नाही अब्रू, तर मी कुणाला घाबरू,’ अशी या सरकारची स्थिती आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या अश्‍वासनांपैकी एकही आश्‍वासन या सरकारने पूर्ण केले नाही. या सरकारवर शेतकरी, नोकरदार, तरुण, बेरोजगार, आदिवासी, नाराज आहेत. मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाखांपैकी 15 रुपये आलेले नाहीत. ज्या व्यक्तीला संसारच नाही, तिला गॅसची किंमत दुप्पट झाल्याचे दुःख काय कळणार? असा सवाल करीत अजित पवार यांनी मोदींना लक्ष्य केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)