सत्तेवर आल्यास धनगरांना आरक्षण

अजित पवार यांचे आश्‍वासन : नव्या दोन धरणांचे जलपूजन

अकोले -प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात सत्ता नसताना पळसुंदे व पिंपळगाव खांड धरणाच्या भूमिपूजनाचा, जलपूजनाचा व लोकार्पण सोहळा माझ्या हस्ते होणे, हा दुर्मीळ योग आहे. तो योग मधुकरराव पिचड व आ. वैभवराव पिचड यांनी घडवून आणला, असे ते म्हणाले.

पळसुंदे धरणातील पाण्याचे पूजन व लोकार्पण पवार व माजी जलसंपदामंत्री आ. शशिकांत शिंदे या दोन्ही नेत्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड होते. याप्रसंगी आ. वैभवराव पिचड, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मीननाथ पांडे, ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, एकनाथ शेळके आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की या दोन्ही धरणांसाठी मधुकरराव पिचड यांनी सतत पाठपुरावा केला. धरण होताना अनेकांची शेती गेली त्यांचे पुनर्वसन केले. या धरणाला वेळ लागला. त्यामुळे हे धरण चार कोटींवरून 28 कोटीपर्यंत गेले. शेतकऱ्यांना विश्‍वासात घेऊन धरणाची उंची वाढवावी. पळसुंदे धरणाचे काम करण्याचे काम मी, रामराजे निबाळकर व शशिकांत शिंदे यांनी केले. केंद्रात व राज्यात जातीयवादी व शेतकऱ्यांच्या विरोधात असणारे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही सर्वांनी, इतर शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. त्यामुळे सरकायला जाग आली आणि कर्जमाफी केली; मात्र लाभ कुणालाच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आ. राम कदम यांच्यावर पवार यांनी टीका केली. भाजपच्या मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. नोटाबंदीमुळे वाटोळेच झाले आहे. या सरकारने बॅंका लुटल्या. नीरव मोदी व विजय मल्ल्या यांनी देश व बॅंका लुटून नेल्या; मात्र त्यांचे भाजप सरकारने काहीही वाकडे केले नाही. या सरकारने चार वर्षांत इंधन व पेट्रोलच्या कराच्या पोटी तुमच्या खिशांतून 12 लाख कोटी रुपये काढले, असा आरोप करून राज्यात पेट्रोल व डिझेल भाववाढीच्या विरोधात दहा तारखेला बंद पुकारला आहे. त्यात राष्ट्रवादी सहभागी झाली होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

शिंदे म्हणाले, की शरद पवार, मधुकरकाव पिचड आणि अजित पवार यांनी माझ्याकडे जलसंपदा खाते देऊन कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिले. त्या वेळी पिचड यांनी निधी कमी पडत असेल तर आदिवासी विभागाचा निधी घ्या; मात्र पळसुंदे धरण पूर्ण करा, असा आग्रह धरला. त्यांनी आदिवासीच्या जीवनात आनंद देण्याचे काम केले आहे. वैभव पिचड हे जनतेच्या प्रश्‍नासाठी आक्रमक झाले. ते सर्वसमान्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. हे सरकार आदिवासी मुलांच्या शाळा बंद करण्याचे काम करत आहे. हुकूमशाही वृत्तीचे हे सरकार उलथवून टाका व राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर आणा.

आ. पिचड म्हणाले, “”युतीच्या सरकारच्या काळात तालुक्‍यात कोणत्याही योजना आल्या नाहीत. रस्त्याची कामे रखडली. शासनाच्या कर्जमाफीचा लाभ अकोले तालुक्‍यातील शेतकऱ्यांना झाला नाही. हे युतीचे सरकार बदला आणि राष्ट्रवादीचे सरकार आणा. अकोल्यातील कुत्तरकडा, खेतेवाडी ही धरणे पूर्ण करायची आहेत. तत्पूर्वी पवार यांनी याच गावातील बल्क कुलरचे उदघाटन केले, तेव्हा आमचे बल्क कुलर येवून पाहा असा सल्ला दिला. कोतूळ, ब्राह्मणवाडा, बेलापूर, बोटा येथे व धामणगाव पाट व आवारी येथे त्यांचे कार्यकर्त्यानी जंगी वागत केले.

अकोल्यासाठी सोन्याचा दिवस

पळसुंदे धरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते; मात्र न्यायालयीन वाद चालू होते. तो वाद दूर करून पवार व शिंदे या दोन्ही नेत्यांनी या धरणाचे काम 2011 मध्ये पुन्हा सुरू केले. अनेक अडचणींवर मात करून या वर्षी पळसुंदे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. हा या भागातील जनतेसाठी सोन्याचा दिवस आहे; मात्र अजून या परिसरातील जनतेची तहान भागली नाही. त्यासाठी या धरणाची उंची वाढवावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)