आढळातून गुरुवारपासून सोडणार आवर्तन

शेतीसाठी असलेले आवर्तन 25 दिवस चालणार;कालवा सल्लागार समितीचा निर्णय

अकोले – आढळा धरणातून रब्बी हंगामासाठी गुरुवारी (दि.29) सकाळी 6 वाजता आवर्तन सोडण्याचा निर्णय धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आज जाहीर करण्यात आला. हे आवर्तन किमान 25 दिवसांचे राहणार असून “टेल टू हेड’ असे धोरण यावेळी कायम राहणार आहे. पाण्याची चोरी, शेततळे भरणे हा दखल पात्र गुन्हा ठरणार आहे. या पहिल्या व शेवटच्या आवर्तन काळात “काल निहाय सिंचन’ केले जाणार असल्याने याचा लाभधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार वैभव पिचड यांनी केले.

अकोले येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. पिचड होते. बैठकीस जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती कैलास वाकचौरे, सदस्य जालिंदर वाकचौरे, आर. एम. कातोरे, तसेच पं स सदस्य, तसेच अगस्तीचे कारखाना संचालक मीनानाथ पांडे, संगमनेरचे चंद्रकांत कडलग, गिरजाजी जाधव, दादापाटील वाकचौरे आणि सरपंच, अकोले, संगमनेर व सिन्नर या तालुक्‍यातील लाभधारक शेतकरी उपस्थित होते. तसेच नगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, अकोले पाटबंधारे उपविभागीय अभियंता आर. डी. आरोटे आणि संगमनेर पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता गणेश हारदे उपस्थित होते.

आ. पिचड म्हणाले, या आवर्तन काळात जलसंपदा विभागाने पाण्याचा अपव्यय टळेल यासाठी काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनीही दुष्काळी स्थिती असल्यामुळे पाण्याची चोरी करू नये. शेततळे भरू नये. पाण्याच्या प्रवाहात कचरा टाकू नये. तर गावनिहाय क्षेत्र जलसंपदा विभागाने तयार करून, त्याप्रमाणे गावांना माहिती कळवावी व हे आवर्तन निर्विघ्नपणे पार पाडावे असे आवाहन केले.

कार्यकारी अभियंता देशमुख यांनी पाण्याची चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा दिला. यावेळी या भागातील कर्मचाऱ्यांनी पाणी चोरीकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशी सज्जड तंबी दिली. उद्या सुरू होणारे आवर्तन केवळ चाऱ्या दुरुस्ती आणि कालव्याचे काम दुरुस्तीसाठी पुढे ढकलले गेले आहे असे आरोटे म्हणाले.

आजमितीस आढळा धरणात 537 दलघफू पाणीसाठा आहे. त्यापैकी 275 दलघफू पाणी सिंचनासाठी वापरून उर्वरित 237 दलघफू पाणी पिण्यासाठी राखीव राहील, असेही ते म्हणाले. धोरणानुसार एका शेतकऱ्याला 3 एकर व एकरी 3 तास पाणी दिले जाईल. हे आवर्तन साधारण 25 दिवसांचे असेल. शिवाय कालवा फोडण्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा हारदे यांनी दिला. दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन जलसंपदा विभागातर्फे व उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)