रहस्य: अबाऊट टर्न

हिमांशू

या देशात काहीही घडू शकते, असे ममता बॅनर्जींना पाठिंबा देताना कुणीतरी म्हटलंय. या वक्‍तव्याला येत्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ आहे आणि हे एक राजकीय विधान आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांना अडचणीत आणण्याचा कोणताही प्रयत्न नजरेआड करता येणार नाही, असा या वक्‍तव्याचा सरळसरळ अर्थ. परंतु या देशात कधीही, काहीही घडू शकते, हे पटण्यासाठी नेतेमंडळींना निवडणुकीची वाट पहावी लागते. त्या तुलनेत जनता नशीबवान. कधीही, काहीही घडू शकते, हे गृहित धरूनच लोक घराबाहेर पडतात. ही शक्‍यता लोकांनी हेल्मेटला विरोध करतानाही गृहित धरलेली असते तशीच घराला कुलूप घालतानाही गृहित धरलेली असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशीच एक गृहित धरलेली शक्‍यता म्हणजे, सत्याचा उलगडा होईल. बात भ्रष्टाचाराच्या आरोपाची असो वा एखाद्या अनपेक्षित घटनेची असो, त्यामागील वास्तव आपल्याला कधी ना कधी समजेल, असं लोकांना उगीचच वाटत राहतं. पण असे विषय माध्यमांना खाद्य पुरवतात आणि केवळ चर्चा मागे ठेवून निघून जातात. ज्या पनामा आणि पॅरडाइज पेपर्सची चर्चा जगभरात होते आणि आपल्या शेजारी राष्ट्राचा प्रमुख सत्ता गमावतो, त्या यादीत नावं असलेल्या भारतीयांचं पुढे काय झालं, मुळात ते दोषी आहेत की नाहीत, हेही उलगडत नाही.

परदेशात लपवलेला भारतीयांचा काळा पैसा हा एके काळी खूपच मोठा चर्चाविषय होता. आंदोलनं, उपोषणं झालेली. वादे आणि दावे झालेले. दिल्लीतल्या सरकारचा तख्ता पालटण्यात या अस्त्राचा मोठा वाटा आहे, असंही बोललं गेलं. पारदर्शकतेसाठी कायदेकानू, लोकपाल वगैरेची चर्चा झाली. याच कालावधीत तीन वेगवेगळ्या अधिकृत संस्थांनी भारतीयांच्या काळ्या पैशासंबंधी अहवाल तयार केले होते. अहवालांच्या तारखा 2013 आणि 2014 मधल्या आहेत. सध्या 2019 सुरू आहे आणि या संस्थांचा अहवाल माहिती अधिकारात मागितला असता, अर्थ मंत्रालयास सादर केलेला असल्यामुळे तो देता येत नाही, असं उत्तर माहितीच्या अधिकारात मिळालंय.

अर्थ मंत्रालयाची समिती या अहवालांची छाननी करतेय आणि तत्पूर्वी तो सादर करणं हा सभागृहाचा हक्कभंग ठरेल, असं उत्तरात म्हटलंय. इतक्‍या संवेदनशील माहितीची छाननी करण्यासाठी लागलेला कालावधी खरं तर कमीच म्हणायला हवा. आपल्याकडे भ्रष्टाचारावर सगळेच पक्ष बोलले. पण पनामा आणि पॅरडाइजवर कुणीच अजूनही बोललेलं नाही. गेल्या निवडणुकीपूर्वी मिळालेलं आश्‍वासन अजून पूर्ण झालं नाही म्हणून या निवडणुकीपूर्वी उपोषणाला बसलेल्या अण्णांकडे ढुंकूनही न बघणारे एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. संरक्षणविषयक कोणत्या व्यवहारात नेमकं काय घडलं, हे समजायला मार्ग नाही. तात्पर्य, वास्तव समोर येईल, हे गृहित धरता येत नाही.

भ्रष्टाचार, काळा पैसा हे तर खूप मोठ्ठे विषय. इथं तर नव्या मुंबईत पॅराशूटमधून कोण उतरलं अशा रहस्यांचाही उलगडा होत नाही. कुणीतरी फॉरेनची बाई होती. पॅराशूटच्या साह्यानं ती उतरली आणि स्थानिकांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करीत तिला न्यायला आलेल्या माणसासोबत गाडीतून निघून गेली. पोलिसांना सीसीटीव्हीत गाडीही दिसली नाही आणि पॅराशूटही. दोन व्यक्ती मात्र दिसल्या. जिथं विमानाच्या कॉकपिटमध्ये घुबड कुठून शिरलं हे कळत नाही, तिथं काय अपेक्षा करणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)