अबाऊट टर्न: अनाकलनीय

हिमांशू

अनाकलनीय… लोकसभा निवडणुकीच्या निकालावर “व्हिडिओ फेम’ राज ठाकरे यांच्याकडे एवढीच प्रतिक्रिया होती… एका शब्दाची! तसे पाहायला गेले, तर बऱ्याच जणांना बरेच काही अनाकलनीय आहे. नेत्यांपासून राजकीय पंडितांपर्यंत सगळे धक्‍क्‍यात आहेत आणि धक्‍का ओसरल्यानंतरच विश्‍लेषणं वगैरे सुरू होतील, अशी शक्‍यता आहे. तूर्त सर्वांसाठी सर्वकाही “अनाकलनीय’! निवडणुकीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणं आणि कॉंग्रेस कार्यकारिणीने जागच्या जागी तो फेटाळणं, ही झाली “आकलनीय’ घटना. म्हणजे यापेक्षा वेगळे काही घडले असते, तरच आश्‍चर्य वाटले असते.

कार्यकारिणीने राजीनामा स्वीकारला असता, तर ती निकालाच्या बातमीपेक्षा मोठी बातमी ठरली असती. परंतु एकतर अवतीभोवती सर्व काही “अनाकलनीय’ घडत असताना लोकांना वास्तवात आणणे ही कॉंग्रेसची नैतिक जबाबदारीच ठरते! आधीच धक्‍क्‍यात असलेल्यांना आणखी एक धक्‍का कशाला द्यायचा? असा सुज्ञ विचार कॉंग्रेस कार्यकारिणीने केला. शिवाय, वर्तमानपत्रांमध्ये किंवा वाहिन्यांमध्ये, आता महत्त्वाची जागा पटकावण्याची कॉंग्रेसला अजिबात इच्छा राहिलेली नाही. ही परिस्थिती माध्यमांनी आणली की निकालाने, कोण जाणे. माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा किती बेरकी! पूर्वी बोलावूनसुद्धा जात नसत… आता दिसेल त्या कॉंग्रेसवाल्याला पकडतायत. हेही “अनाकलनीय’च! अहो, राहुल गांधींचं राजीनामा”नाट्य’ झाल्यानंतरची पत्रकार परिषद माध्यमांनी “लाइव्ह’ दाखवली, काय हे!

माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिल्लीत नारायण राणेंना गाठले. ते आधीच “अनाकलनीय’ परिस्थितीमुळे वैतागलेले. “”आम्हाला हा निकाल मान्य नाही,” असे सिंधुदुर्गातल्या पत्रकारांना सांगून बाहेर पडलेले. त्यात दिल्लीतल्या पत्रकारांनी विचारले, तुम्ही कॉंग्रेसमध्ये कधी जाणार? हा प्रश्‍न राणेंना अगदीच “अनाकलनीय’ होता. कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यामुळे अनेक जुन्या कॉंग्रेस नेत्यांना स्वगृही आणण्याचे प्रयत्न सुरू झालेत, अशी “टिप’ पत्रकारांना कुठूनतरी लागली होती म्हणे! खरं तर धक्‍क्‍यात असलेल्या कुठल्याही पक्षाकडून पुढच्या हालचाली इतक्‍या झटपट सुरू होणे अवघड वाटते; पण माध्यमांना “कुठूनतरी’ या गोष्टी कळतात आणि ते राणेंसारख्यांना “काहीतरी’ विचारतात. खरं तर राणे नुकतेच महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडलेले. त्यानंतर अचानक हा प्रश्‍न ऐकून ते खवळलेच.

“”माझ्या कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा कुठून सुरू झाली? माझी कुणासोबत काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळं कॉंग्रेस प्रवेशाचा प्रश्‍नच येत नाही,” असं उत्तर राणेंनी दिले. वास्तविक आधीच “अनाकलनीय’ झालेले वातावरण पत्रकारांनी अधिक कॉम्प्लिकेटेड करणे योग्य नव्हे; पण त्यांनाही “सूत्रांकडून’ काहीबाही कळत असते, त्याला ते तरी काय करणार!

“अनाकलनीय’ अशी प्रतिक्रिया देणाऱ्या राज ठाकरेंचेच उदाहरण पाहा. ते लोकसभेसाठी सभा घेत असतानाच विधानसभा निवडणुकीत ते कुणासोबत जाणार आणि संबंधित पक्ष त्यांना किती जागा देणार, याच्या खमंग चर्चा रंगल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी कॉंग्रेस आघाडीकडून काही जागा मागितल्याची चर्चा होती. राज यांना ती जाहीरपणे नाकारावी लागली. आताही अनेक नेत्यांना थोडा “ब्रीदिंग स्पेस’ हवाय… कुणी सांगावं… कदाचित “अनाकलनीय’ शब्दापासूनच त्यांची पुढची वाटचाल सुरू होईल!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)