माझी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी- कोहली

ऍडलेड येथील खेळी सर्वोत्कृष्ट

बर्मिंगहॅम: विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करताना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे आव्हान कायम राखले. विराटच्या 149 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावातील 287 धावांच्या प्रत्युत्तरात 274 धावांची मजल मारली. परंतु ही खेळी आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्‍त केले. तसेच या खेळीत आपल्या मानसिक व शारीरिक क्षमतेची कसोटी लागल्याचेही कोहलीने सांगितले.

-Ads-

सुमारे चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात ऍडलेड येथील कसोटी सामन्यात माफक धावसंख्येचा पाठलाग करताना विराटने 141 धावांची संस्मरणीय खेळी केली होती. आपल्या मते ती खेळी आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम असल्याचेही विराटने म्हटले आहे. त्या वेळी भारतासमोर विजयासाठी कोणते लक्ष्य आहे, याची मला पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे विशिष्ट लक्ष्य ठेवूनच मी फलंदाजी केली होती. परंतु या वेळच्या डावात माझ्यासमोर तसे कोणतेही निश्‍चित लक्ष्य नव्हते. त्यामुळे भारताला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल मी समाधानी आहे, असेही विराटने सांगितले.

डिसेंबर 2014 मध्ये ऍडलेड येथे झालेल्या त्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावांत शतके झळकावली होती. तरीही दुसऱ्या बाजूने विराटला कोणाचीही साथ न मिळाल्यामुळे भारताला हा सामना गमवावा लागला होता. कालचा दिवस काही अर्थांने तसाच होता. परंतु या कसोटीतील हा पहिलाच डाव असल्यामुळे आपल्यावर तुलनेने कमी दडपण होते, असे कोहलीने सांगितले.

इंग्लंडच्या 287 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताला मुरली विजय आणि शिखर धवन यांनी 50 धावांची सलामी दिली होती. परंतु सॅम करनच्या माऱ्यासमोर भारताची 5 बाद 100 आणि नंतर 8 बाद 182 अशी घसरगुंडी झाली. यावेळी भारतीय संघ चांगलाच खिंडीत सापडला होता. इंग्लंडचे वेगवान गोलंदाज भरात आले होते आणि भारतीय संघ 105 धावांनी पिछाडीवर होता. मात्र कोहलीने ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांना हाताशी घेऊन भारताला 274 धावांपर्यंत नेले.

कोहलीने तळाच्या फलंदाजांची प्रशंसा करताना सांगितले की, हार्दिकने उपयुक्‍त कामगिरी केली. तसेच ईशांत आणि उमेश यांनी समयोचित कामगिरी करीत मला साथ दिली. या तिघांची साथ खरोखरीच बहुमोल अशी होती.

आघाडी न घेता आल्याचा खेद नाही

मला केवळ शतक झळकावून थांबायचे नव्हते, तर भारतीय संघाचे तारू इंग्लंडच्या धावसंख्येच्या पलीकडे न्यायचे होते. माझा प्रयत्न केवळ 13 धावांनी कमी पडला. तसेच मला किमान 15-20 धावांची आघाडी घ्यायची होती. परंतु वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तितक्‍या वेळ आम्ही खेळलो असतो, तर इंग्लंडला दुसऱ्या डावांत फलंदाजी करता आली नसती आणि आम्हाला एक बळी घेता आला, तसेही घडले नसते, असे सांगून कोहली म्हणाला की, संघाला गरज असताना मी कसोटीला उतरल्याचा मला आनंद वाटतो. गेल्या दौऱ्यात मला सतावणाऱ्या अँडरसनवरही मला वर्चस्व गाजविता आले, याचेही मला समाधान वाटते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी मी केलेली पूर्वतयारी योग्य असल्याचे सिद्ध झाले. माझे सहकारी फलंदाज अपयशी ठरले, परंतु यशापयश हा खेळाचाच एक भाग आहे. संघाला बरोबर घेऊन मला पुढे जायचे आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)