मुशर्रफ यांना 2 मे रोजी न्यायालयात हजर होण्याचे आदेश 

इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना 2 मे रोजी देशद्रोहाच्या खटल्यासाठी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले आहेत. या खटल्याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ यांना प्रश्‍नावली देण्यात आली आहे. या प्रश्‍नावलीवरील उत्तरही देण्यास मुशर्रफ यांना सांगण्यात आले आहे.

मुशर्रफ यांच्या विरोधात पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाच्या सरकारने 2013 मध्ये देशद्रोहाचा खटला दाखल केला आहे. मुशर्रफ यांनी 2007 साली देशात आणीबाणी आणून सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांना नजरकैदेत ठेवले होते. तर सुमारे 100 पेक्षा अधिक न्यायाधीशांना कामावरून कमी केले होते, असा मुशर्रफ यांच्यावर आरोप आहे.
मात्र मुशर्रफ मार्च 2016 मध्ये दुबईला निघून गेल्यानंतर त्यांच्या विरोधातील खटल्यात कोणतीही प्रगती होऊ शकलेली नाही. 2016 नंतर मुशर्रफ आजारपणाचे कारण देऊन पुन्हा पाकिस्तानमध्ये परतलेलेच नाहीत. त्यानंतर विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना फरार घोषित केले आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

आता त्यांच्या वकिलांनी मुशर्रफ न्यायालयात सुनावणीला यायला तयार असल्याचे सांगितल्यावर न्यायालयाने रमझानपूर्वी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार 2 मे रोजीच्या सुनावणीला मुशर्रफ यांनी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देशद्रोहाच्या खटल्यामध्ये दोषी आढळल्यास मुशर्रफ यांना फाशी किंवा अजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)