मुशर्रफ पाकिस्तानात परतण्याची शक्‍यता कमीच

2 मे रोजी राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी

इस्लामाबाद – ढासलेली प्रकृती आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ हे पाकिस्तानला परत येण्याची शक्‍यता कमीच असल्याचे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. राजद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी पाकिस्तानला परतणार आहेत, असे त्यांचे वकिल सलमान सफदार यांनी पत्रकारांना सांगितले आहे. पुढील महिन्याच्या 2 तारखेला होणाऱ्या या खटल्याच्या सुनावणीसाठी कोर्टाने मुशर्रफ यांना समन्स बजावले आहे. मात्र मेडिकल बोर्डाची शिफारस आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे मुशर्रफ पाकिस्तानला परतणार नाहीत, असे पाकिस्तानातील काही प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.

मुशर्रफ यांच्या पाठीचे दुखणे आहे. त्यामुळे मेडिकल बोर्डाने त्यांना प्रवास न करण्याची सूचना केली आहे. प्रकृती ठिक नसल्यामुळे मुशर्रफ यांनी प्रवास करू नये, असे त्यांच्या कुटुंबीयांचेही म्हणणे आहे. मात्र मुशर्रफ शब्द पाळतात. त्यामुळे ते परतण्याची शक्‍यता 50 टक्केच आहे, असे ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे सदस्य अली नवाब चित्राली यांनी म्हटले आहे.

मुशर्रफ यांनी 2007 साली आणलेल्या आणीबाणीविरोधात नवाझ शरीफ यांच्या सरकारने मुशर्रफ यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल केला आहे. विशेष न्यायालयाने मार्च 2014 साली मुशर्रफ यांच्यावर खटला सुरू केला. मात्र वैद्यकीय कारणासाठी 2016 साली मुशर्रफ दुबईला गेले. ते तेंव्हापासून पाकिस्तानला परतलेले नाहीत. गेल्या महिन्यात त्यांना अचानक दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

2 मे रोजीच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्यास त्यांची बाजू ऐकून घेतली जाणार नाही, असे न्यायालयाने मुशर्रफ यांना सुनावले आहे. मुशर्रफ यांचा पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रही रद्द करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)