तलवारीने वार करून मित्रानेच केला खून

अल्पवयीन ताब्यात : ताथवडे परिसरातील घटना

पिंपरी – किरकोळ वादातून मित्रानेच तलवारीने वार करुन खून केला. घटना उघड झाल्यानंतर अवघ्या काही तासातच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने खून करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला रावेत परिसरातून ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.29) सकाळी साडे नऊच्या सुमारास ताथवडे येथील बालाजी कॉलेज रस्त्यावर ही घटना उघडकीस आली.

जुबेर गुलाब मुजावर (वय-19, रा. सपकाळ चाळ, सोनवणे वस्ती, ताथवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणी ताथवडे, सोनावणे वस्ती येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहेत. जुबेर व आरोपी हे मित्र होते. ते नेहमी दारू पिण्यासाठी एकत्र बसत असत. गुरुवारी रात्री ते ताथवडे येथील बालाजी कॉलेजकडे जाणाऱ्या निर्जन रस्त्यावर दारू पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाले. रागाच्या भरात मुजावर याने मित्राला मारण्यासाठी तलवार उगारली. त्यावेळी आरोपी याने मुजावरच्या डोक्‍यात दगड मारून त्याला जखमी केले. त्यानंतर मुजावरची तलवार घेऊन त्याच्यावरच वार करून खून केला. शुक्रवारी सकाळी मुजावरचा मृतदेह आढळल्यानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली.

दरम्यान आरोपी हा रावेत परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)