डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या
पाणी साठण्याबाबत पुरेसे गांभीर्य नसल्याची बाब समोर
पुणे – डेंग्यू रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल 750 गृहनिर्माण संस्थांना नोटीस दिली आहे. या सोसायट्यांच्या आवारात साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
डेंग्यू डासांची उत्पत्ती होण्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून ठिकठिकाणी जागृती करण्यात येत आहे. त्या दरम्यान सोसायट्यांमध्ये पाहणीही करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान सोसायट्यांमध्ये पाणी साठण्याबाबत पुरेसे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. त्यावर उपाय म्हणून आरोग्य विभागाकडून ही नोटीस बजावण्याची कारवाई करण्यात आली.
जूनपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. जूनमध्ये सुमारे 300 सोसायट्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यासह आजपर्यंत 750 सोसायट्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.