महापालिकेचा मिळकतकर घटणार

आतापर्यंत केवळ 456 कोटी जमा; उद्दिष्ट गाठण्यात येणार अपयश

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार ठरलेल्या मिळकतकरात यावेळी घट होण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत केवळ 3 लाख 7 हजार मिळकतधारकांनी आपला कर जमा केला असला तरी दोन लाखांहून अधिक मिळकत धारकांनी कर भरण्याकडे दूर्लक्ष केले आहे. या प्रकारामुळे पालिकेकडे आतापर्यंत केवळ 456 कोटींची रक्कम जमा झाली आहे. यावर्षी 525 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. वर्ष संपण्यास केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्याने उद्दीष्ट गाठण्यातही पालिकेला अपयशच येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

जकात आणि त्यानंतर एलबीटीचे उत्पन्न बंद झाल्यानंतर महापालिकेचा प्रमुख उत्पन्नाचा मार्ग म्हणून मिळकत कर विभागाकडे पाहिले जाते. मिळकतकर विभागाकडून यावर्षी पालिकेला 525 कोटींचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. शहरातील मिळकतींची संख्या पाच लाखांहून अधिक आहे. अंदाजपत्रकात शास्तीकराची अडचण असल्याने उद्दीष्टही कमी ठेवण्यात आले होते. मात्र कमी ठेवलेले उत्पन्न गाठण्यातही अद्यापपर्यंत यश आलेले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे शुक्रवार (दि.29) अखेर 456 कोटी रुपयांचा मिळकत कर जमा झाला आहे. करसंकलन विभागाने उत्पन्न वाढीसाठी अनेक उपाय योजले मात्र त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच आता निवडणुकीचे काम सुरू झाल्यामुळे त्याचाही फटका मिळकत जमा करण्यात येत आहे. पालिकेकडे एकुण 5 लाख 6 हजार 927 मिळकतींची नोंद असून आतापर्यंत 3 लाख 7 हजार 812 मिळकत धारकांनी रक्कम भरली आहे. उर्वरित दोन लाख मिळकधारकांनी रक्कम न भरणेच पसंद केले आहे. रविवारी 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष संपत आहे. सुट्टीच्या दिवशी करसंकलन कार्यालये सुरू ठेवण्यात आली असली तरी उद्दीष्ट गाठण्यात यश येणे अशक्‍य असल्याचे सांगण्यात येत आहे.

नोटरीद्वारे दाखविले जाणारे विभाजन अमान्य

एक हजार चौरस फुटापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामाला सध्या शास्तीकर लावण्यात येत आहे. मात्र एक हजारापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामाधारकांनी नविनच शक्कल लढविली आहे. एक हजारापेक्षा अधिकचे बांधकाम कुटूंबात विभागून दाखविण्यात येत आहे. त्यासाठी नोटरीची कागदपत्रे तयार करून ती सादर केली जात आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आता करसंकलन विभागाने नोटरीद्वारे दाखविण्यात आलेले विभाजन ग्राह्य धरले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शास्तीपासून वाचण्यासाठी पळवाट काढणाऱ्यांना त्याचा फटका बसणार असून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)