मुनगंटीवारांचे मनेका गांधींना थेट आव्हान

वाघिणीच्या हत्येची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करा!

फोनसाठी पन्नास पैसे खर्च केले असते तर माहिती दिली असती

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई – पांढरकवडा वनक्षेत्रपरिसरात अवणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनी ट्‌विटरवरून महाराष्ट्राच्या वन्यमंत्र्याना झापल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना आज चोख उत्तर दिले आहे. मनेका गांधी यांनी जाहिरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते. माहितीच्या अभावी त्यांनी असे भाष्य करणे योग्य नाही. अवनी ही वनकर्मचाऱ्यांची शत्रू नाही, तिला ठार मारण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता, असे सांगतानाच याप्रकरणाची मनेका गांधी यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करावी, असे थेट आव्हान देत आपण त्यांना पत्र लिहिणार असल्याचे मुनगंटीवार यांनी आज सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्र परिसरात टी-1 या प्रजातीच्या अवनी वाघिणीने 13 जणांचा बळी घेतला होता. या वाघिणीला शुक्रवारी रात्री खासगी शार्प शूटरमार्फत ठार करण्यात आले. अवनीच्या हत्येनंतर देशभरात सोशल मिडियावर वन्यप्रेमींनी राज्य सरकार व वनकर्मचाऱ्यांना टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्रिय मंत्री मनेका गांधी यांनीही जाहिरपणे ट्‌विट करीत अवनीला गोळ्या घालणे म्हणजे ती एकप्रकारे हत्याच असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कमालीच्या संतापल्या होत्या. एवढेच नव्हे तर अवणीला मारण्यासाठी एका गॅंगस्टरला बोलावल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

मनेका गांधींच्या या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत वनविभागाची बाजू मांडली. मनेका गांधी यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्याला वनमंत्री म्हणून नियुक्तच कसे करतात असा सवाल केला होता. अवणी ही वन्यकर्मचाऱ्यांची शत्रू नव्हती. तिला ठार मारण्याचा त्यांचा उद्देशही नव्हता. अवनीला बेशुध्द करण्याचे इंजेक्‍शन मारण्याचा प्रयत्न केला पण वाघिणीने हल्ला केला म्हणून शेवटी गोळी घातल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही, असा दावा त्यांनी केला. माझ्या कार्यकाळात मी कधीही वाघाला मारण्याचे आदेश दिलेले नाहीत. 2017 मध्ये एका वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले होते, असे सांगत मंत्री किंवा सचिवाला वाघाला मारण्याचे आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

13 जणांचा बळी घेणाऱ्या अवनीला गोळी घालून ठार मारण्यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला होता. त्यामुळे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा कोणत्याही पातळीवर चौकशी करा, पण वन कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करू नका. वन कर्मचारी हे व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचे काम करीत आहेत असे ते म्हणाले.

पिलिभितमध्ये शाफत खानला प्रशस्तिपत्र

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पिलिभित मतदारसंघातील एका नरभक्षक वाघिणीला शार्पशूटर शाफत अली खान यांनीच गोळ्या घालून ठार केले तेव्हा तेथील वनविभागाने शाफत अली खान यांचे प्रमाणपत्र पाठवून अभिनंदन केले होते याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिले. देशातील 9 राज्यात शाफत अली खान यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे असा दाखला त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)