ग्रामसेवकाच्या बदलीसाठी मुंडण आंदोलन

पानवणचे ग्रामस्थ आक्रमक : कामचुकार ग्रामसेवकाची तातडीने बदली करण्याची मागणी

गोंदवले – पानवण, ता. माण येथील ग्रामसेवक विकास गायकवाड ग्रामपंचायतीच्या कामात चुकारपणा करत असून सतत गैरहजर राहत असल्याच्या कारणावरून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी करत पंचायत समितीच्या पुढे ग्रामस्थांनी सामुदायिक मुंडण करून निषेध व्यक्त केला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात गजीनृत्यही खेळण्यात आले. या आंदोलनाने सभापती मात्र हतबल होऊन बसले होते. यावेळी दहिवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पानवण ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत ग्रामसेवक विकास गायकवाड आठ महिन्यांपासून सतत गैरहजर राहत आहेत. ग्रामपंचायतीमधील कोणत्याही प्रकारची शासकीय माहिती लोकांना मिळत नाही. सर्वसामान्य लोकांची ग्रामपंचायतीमधील काम वेळेवर होत नाहीत. गावाने पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतला होता. पण त्यांनी कोणतीही मदत केली नसल्याने गावाचा तोटा झाला आहे.

14व्या वित्त आयोगाचा 24 लाख निधी ही त्यांच्यामुळे शिल्लक राहिला आहे. या गावाच्या अडचणींबाबत अनेकवेळा माण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि सभापती यांना लेखी निवेदन देऊन ही आठ महिन्या पासून कोणतेही कार्यवाही प्रशासनाकडून झाली नाही. ग्रामस्थांची मोठी पिळवणूक होत आहे. ग्रामसेवकांच्याकडे किरकसाल गावाचाही अधिभार आहे. ते किरकसाल येथे कामावर येतात मात्र, पानवणला येण्यास कुचराई करत असल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे आम्हाला स्वतंत्र ग्रामसेवक त्वरित मिळावा या मागणीसाठी पानवणचे अबालवृध्द व युवकांनी सकाळी माण पंचायती समोर “आमच्या मागण्या मान्य करा” नाही तर “खुर्ची “खाली करा, अशा घोषणा देत प्रशासनाला इशारा दिला. ढोल आणि तुतारी या वाद्यांसह पंचायत समितीच्या आवारातच गजीनृत्याची घाई धरण्यात आली. बघता-बघता ग्रामस्थांनी मुंडण करण्यास सुरुवात केली. यावेळी सभापती रमेश पाटोळे व गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी सरपंच आणि काही ग्रामस्थांना बोलावून चर्चा केली. आंदोलनाची सर्वत्र मोठी चर्चा सुरू होती. आज दहिवडीचा आठवडी बाजार असल्याने येणारा प्रत्येकजण आंदोलनाकडे कुतूहलाने पाहत होता.

पानवणला मी स्वतः भेटी दिल्या होत्या. त्यावेळी ग्रामसेवक अनेक वेळा 12 वाजता आलेले मी पाहिले आहेत. फक्त 1 तास थांबून हे लगेच निघून जात असल्याने लोकांची पिळवणूक होत होती हे मी पाहिलेले आहे. रमेश पाटोळे, सभापती माण पंचायत समिती ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे दि. 21 फेब्रुवारीला नवीन ग्रामसेवक दिलेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आज आंदोलन करायला नको होतं.
-गोरख शेलार, गटविकास अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)