मगोप भाजपात विलीन 

-गोव्यात नाट्यमय राजकीय घडामोडी 
-उपमुख्यमंत्रीपद भुषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना डच्चू 
– दोन आमदारांनी भाजपात प्रवेश 
पणजी  – गोव्यात मध्यरात्री मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात फूट पडली असून पक्षातील दोन आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पत्र दिले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकून तीन आमदार आहेत. यात आम्ही दोन तृतीयांश सदस्य असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी मंगळवारी रात्री पावणे दोनच्या सुमारास गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांच्याकडे पक्ष भाजपात विलीन करत असल्याचे पत्र सादर केले. मात्र महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी या पत्रावर सही केलेली नाही. सुदीन ढवळीकर भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे आमदार भाजपात आल्याने गोव्यातील भाजपा सरकार आता स्थिर झाले आहे. गोवा विधानसभेत 36 सदस्यांपैकी आता भाजपाचे 14 सदस्य आहेत.

दरम्यान, गोव्यात प्रचंड वेगाने राजकीय हालचाली घडत आहेत. उपमुख्यमंत्रीपद भुषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना आज (बुधवारी) मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. लोक आणि काळ काय ते ठरवील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगो) अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे. मगो पक्ष भाजपाप्रणीत आघाडीचे सरकार पाडू पाहत होता. त्यामुळे आम्ही मगो पक्ष सोडला, असे मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांनी येथे जाहीर केले आहे. मगो पक्षाकडे एकूण तीन आमदार होते. त्यापैकी आजगावकर आणि सावर्डे मतदारसंघाचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर हे मगो पक्षापासून वेगळे झाले. त्यांनी भाजपामध्ये आपला गट विलीन केला आहे. भाजपाने मगोपच्या पूर्ण विधिमंडळ गटाचे भाजपामध्ये विलीनीकरण झाले अशी भूमिका घेतली आहे. आम्ही मगोप सोडून जाणार नव्हतो पण आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी भाजपामध्ये जावे लागले. आम्ही आनंदाने भाजपामध्ये गेलो, असे दिपक पावस्कर म्हणाले आहेत.

सुदिन यांनी फॉर्म्युला पाळला नाही : मुख्यमंत्री

सरकार घडविताना काही अटी व फॉर्म्युला निश्‍चित करण्यात आला होता. मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर यांनी त्याचे पालन केले नाही. यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागला, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. सावंत म्हणाले, की आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर घडत असते. मगोपने हा कार्यक्रम पाळला नाही. फॉर्म्युला मानला नाही. शिरोडा मतदारसंघात मगोपने उमेदवार उभे करणे ही पूर्णपणे त्या पक्षाची चूक आहे. आम्ही मगो पक्ष फोडला नाही. मगोपच्या दोघा आमदारांना मगोमध्ये असुरक्षित वाटू लागले. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही त्यांना प्रवेश दिला. कुणीही भाजपमध्ये येत असल्यास आम्ही स्वागत करू. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)