महावितरणची वसुली जोरात

पुणे – राज्यभरात दिवाळीची धामधूम सुरु असतानाच महावितरण प्रशासनाने महसूल वसुलीसाठी जोर लावला आहे. कामगारांना मिळणारा बोनसमुळे वसुलीसाठी यश येईल, असे गृहीत धरुन प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले आहे. हे टार्गेट पूर्ण केल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “बक्षिसी’ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे वसुलीत अपेक्षेपेक्षाही अधिक यश येईल, असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्यातील वीजयंत्रणेची पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महावितरण प्रशासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळेच राज्यभरातील सर्व प्रकारच्या ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा होत आहे. त्याशिवाय वीजगळतीचे प्रमाण बहुतांशी कमी झाल्याने काही अपवाद वगळता भारनियमन कमी करण्यासही प्रशासनाला यश आले आहे. मात्र; हे वास्तव असतानाही थकबाकीचा टक्का दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढतच चालली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा टक्‍का कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत विविध पातळीवर प्रयत्न करण्यात आले, तरीही हा आकडा अपेक्षित कमी न झाल्याने मुख्य कार्यालयाने सर्वच परिमंडलाच्या प्रमुखांना कानपिचक्‍या दिल्या होत्या. यासंदर्भात कठोर पावले उचलण्याच्या सूचनाही या प्रमुखांना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वच परिमंडलांनी महसूल वसुलीच्या संदर्भात कडक भूमिका घेतली आहे. सध्या दिवाळी तोंडावर असल्याने आणि कामगारांना बोनस मिळणार असल्याने प्रशासनाने महसूल वसुलीवर सर्वाधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व परिमंडलांना वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अपेक्षित वसुली केल्यास त्यांना बक्षिस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, थकबाकीच्या वसूलीसाठी यापूर्वीही मोहिमा राबविण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्याच धर्तीवर आताही अशा प्रकारची मोहिम राबविण्यात येत आहे. ग्राहकांनीही ही थकबाकी भरुन प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)