महेंद्रसिंग धोनीला टी-20 मालिकेतून वगळले

वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समावेश नाही

पुणे – वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषण करण्यात आली असून या मध्ये अनुभवी आणि दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकांमधून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय संघाचे कर्णधारपद दिले गेले असून नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी मात्र संघाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे असणार आहे. त्याच बरोबर दोन्ही मालिकेत यष्टीरक्षणाची जबाबदारी युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे देण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या आणि खास करुन टी-20 क्रिकेट मध्ये धोनीने आपल्या कल्पक नेतृत्त्वाने भारताला अनेकदा सामने जिंकवून दिले आहेत. तो फलंदाजीत जरी अपयशी ठरला, तरी त्याची भरपाई त्याने यष्टीरक्षण आणि अनेक अडचणींच्या परिस्थितीत घेत असलेल्या निर्णयांद्वारे भरुन काढतो. मात्र, आता राष्ट्रीय निवडकर्त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या मालिकेसाठी धोनीला संघाबाहेर केले आहे.

4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी कोहलीला विश्रांती मिळाली असून संघाचे नेतृत्त्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे. यासह तिसऱ्यांदा एखाद्या पूर्ण मालिकेत रोहित भारताचे नेतृत्त्व करेल. याआधी त्याने भारतात 2017 साली झालेल्या श्रीलंके विरुद्धची टी-20 मालिका, त्यानंतर 2018 मध्ये श्रीलंकेत झालेली निदाहास टी-20 मालिका आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत रोहितने भारताचे कर्णधारपद भूषविले होते.

कोहलीला विंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेत विश्रांती दिली असून 21 नोव्हेंबरपासून ब्रिस्बेन येथे रंगणाऱ्या ऑस्टेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेतून तो संघात पुनरागमन करेल. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये मुरली विजयलाही स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला वगळले होते.

तर, कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मासह पार्थिव पटेलचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे अंतिम संघात या दोघांना स्थान मिळाल्यास ही संधी हे दोघे कसे साधतात याची उत्सुकता चाहत्यांना असेल. तसेव वेस्ट इंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉ आणि इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलेल्या हनुमा विहारी या युवा खेळाडूंनाही अपेक्षेप्रमाणे संघात स्थान मिळाले आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव आणि शाहाबाझ नदीम.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी-20 संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि खलील अहमद.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी संघ :

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, पार्थिव पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)