300 उमेदवार नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत

लालफितीच्या कारभारात अडकली नियुक्‍ती प्रक्रिया

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकपदी 300 उमेदवारांची निवड करूनही त्यांना अद्यापही राज्य शासनाकडून नियुक्‍तीपत्र मिळालेले नाही. निवड होऊन सात महिने उलटले, तरी हे उमेदवार नोकरीपासून वंचित आहेत. अजूनही ही प्रक्रिया वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणीच्या टप्प्यावरच अडकल्याने निवड झालेले उमेदवार हवालदील झाल्याचे दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एमपीएससी’तर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक पदासाठी जानेवारी 2017 मध्ये अर्ज मागवले होते. यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची पूर्व परीक्षा 8 मे 2017 रोजी झाली. राज्यभरातून 2 लाख 29 हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्याचा निकाल लागल्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये मुख्य परीक्षाही झाली. या परीक्षेचा निकाल 8 जानेवारी 2018 रोजी जाहीर झाला. या परीक्षेद्वारे 300 उमेदवारांनी दुय्यम निरीक्षकपदावर निवड झाली. त्यानंतरची प्रक्रिया मात्र लालफितीच्या कारभारात धूळखात पडून आहे.

सव्वादोन लाख उमेदवारांमधून अंतिम निवड यादीत स्थान मिळविलेल्या या उमेदवारांना सहा महिने झाले, तरी नियुक्तीचे आदेशच मिळालेले नाहीत. आधीच परीक्षा, निकाल या प्रक्रियेला आयोगाने वर्ष घेतले, तर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सहा महिने पूर्ण झाले, तरी या पात्र उमेदवारांना नियुक्तीच दिलेली नाही. हे सर्व उमेदवार वारंवार विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, योग्य ते उत्तर दिले जात नाही, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

“एमपीएससी’कडून उमेदवारांची निवड करून तशी यादी विभागाकडे दिली जाते. त्यानंतर पुढील प्रक्रिया ही संबंधित विभागाद्वारे होत असते. ही प्रक्रिया जिल्हावार पार पडेल, असे आदेश विभागाने काढले होते. मात्र, उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीविषयी परिपत्रक काढले गेले. त्यानुसार आम्ही आमची वैद्यकीय तपासणी करून अहवाल दिला. मात्र, पुढील प्रक्रियेबाबत काहीच माहिती दिली जात नसल्याचे उमेदवारांनी सांगितले. काही विचारणा केल्यास सर्व उमेदवारांचे वैद्यकीय अहवाल मिळाले नसल्याचे सांगितले जाते. मग वैद्यकीय अहवालासाठी कालमर्यादा का निश्‍चित केली नाही? असा सवाल उमेदवारांनी उपस्थित करीत आहेत.

“आम्हाला नियुक्ती मिळावी, यासाठी आम्ही वारंवार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हेलपाटे मारत आहोत. आम्हाला कोणतीही माहिती मिळत नाही. नोकरीसाठी निवड होऊनही आम्हाला नोकरीवर रुजू होण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आणखी किती दिवस वाट पाहाणार? याला केवळ उत्पादन शुल्क विभागाचा उदासीन कारभार कारणीभूत आहे,’ असे एका उमेदवाराने सांगितले.

“त्या’ उमेदवारांमुळे होतोय उशीर
“एमपीएससी’द्वारे झालेल्या अंतिम निवड झालेल्या काही उमेदवारांनी अन्य परीक्षाही दिल्या असून, त्यांची निवडही झाली आहे. मात्र, त्या उमेदवारांनी तशी माहिती उत्पादन शुल्क विभागाला दिलेली नाही. त्यामुळेच त्यांनी वैद्यकीय चाचणीही केलेली नाही. परिणामी, त्यांच्यामुळे ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे, त्यांची निवड होऊनही त्यांना नोकरीपासून वंचितच राहावे लागत असल्याचे उमदेवारांचे म्हणणे आहे.

विभागात 20 वर्षांनी भरती
– 1997 नंतर प्रथमच भरती
– एकूण परीक्षार्थी सुमारे 2 लाख 29 हजार
– अंतिम निवड झालेले विद्यार्थी 300


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)