#MovieReview: खिळवून ठेवणारा ‘स्त्री’

अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री’ हा चित्रपट हॉरर कॉमेडीचा कॉम्बो आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपटाची पटकथा, कॉमेडी आणि हॉरर या सर्व गोष्टी उत्तम पद्धतीने जुळून आल्या आहेत. रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ नंतर पुन्हा एकदा हॉरर कॉमेडीचा कॉम्बो बघायला मिळणार आहे.
‘स्त्री’ ची कथा मध्य प्रदेशाच्या चंदेरी येथील आहे. या गावाच्या प्रत्येक भिंतीवर ‘ओ स्त्री कल आना’ असे लाल शाईने लिहिलेले आहे. कारण गावात स्त्री नावाच्या एका चेटकिणीची दहशत आहे आणि तिच्यासाठी हा संदेश लिहिलेला आहे. या गावात  विक्की (राजकुमार राव) हा टेलर आहे. आपल्या कामात एक्सपर्ट असलेला विक्की महिलांचे माप न घेताच त्यांना फक्त पाहूनच त्यांच्या साइजचे कपडे शिवतो. यामुळेच त्याला चेंदेरीचा मनीष मल्होत्रा असे संबोधण्यात येते.
विकीचा या चेटकिणीच्या कथेवर अजिबात विश्वास नाही.. या गावात दरवर्षी चार दिवसांचा एक उत्सव असतो, याच उत्सवात तो आपले मित्र बिट्टू(अपारशक्ति खुराना) आणि जना (अभिषेक बनर्जी) यांच्या सोबत जातो तेंव्हा यावेळी विक्कीची भेट श्रध्दा कपूरसोबत होते. ती फक्त पूजेच्या रात्रीच गावात राहते. या चार रात्रींमध्ये गावात स्त्रीचा कहर वाढतो अशावेळी त्याचे मित्र विक्कीला सांगतात की, तुझी मैत्रीण भूत आहे. दरम्यान, चंदेरी येथे राहणारा रुद्र (पंकज त्रिपाठी) या मित्रांना चंदेरी पुराणाच्या माध्यमातून स्त्री आणि त्यामागची सत्यता सांगतो. आता श्रध्दा कपूरच स्त्री आहे का? स्त्रीचे रहस्य काय आहे? यासोबतच विक्की आपल्या मित्रांना आणि गावातील लोकांना स्त्रीच्या कहरापासून कसा वाचवतो. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला चित्रपटात मिळतील.
‘स्त्री’ चित्रपटाद्वारे अमर कौशिक दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पर्दापण करत आहेत. राज आणि डीके यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट पाहतांना एका क्षणाला तुम्ही घाबरून ओरडता तर दुस-याच क्षणाला खो-खो हसत सुटता. यातील अनेक प्रसंग भीती आणि हास्य असे दोन्ही अनुभव एकाचवेळी देतात. शेवटपर्यंत हा चित्रपट तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो.  मध्यंतरपर्यंत  फुल टू कॉमेडी आहे. त्यानंतर चित्रपटाची एनर्जी लेव्हल किंचित खाली आलेली आहे.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर राजकुमार रावने पुन्हा एकदा दमदार अभिनय केला आहे.  तो विक्कीच्या कॅरेक्टरमध्ये पुर्णपणे फीट बसला आहे. पंकज त्रिपाठींचा अभिनयही राजकुमारच्या तोडीस तोड आहे. अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती यांनीही आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांना पूरेपूर न्याय दिला आहे. श्रद्धा कपूरने ठीकठीक अभिनय केला आहे.
एडिटींगच्या बाबतीत हेमंत सरकारने कलात्मकता दाखवल्याने चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. चित्रपटाची गाणीही कथेला साजेशी आहेत. केतन सोधाने दिलेले  पार्श्वसंगीत तुम्हाला खिळवून ठेवत. एकंदरीत सांगायचे तर तुम्हाला हॉरर आणि कॉमेडी चित्रपट आवडत असतील, राजकुमार रावचे तुम्ही चाहते असाल तर ‘स्त्री’एकदा आवर्जून बघा.
चित्रपट – स्त्री
निर्मिती – दिनेश विजन, डीके
दिग्दर्शक – अमर कौशिक
संगीत – सचिन – जिगर
कलाकार – राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशाक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी
रेटिंग – ***
भूपाल पंडित

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)