MovieReview: केदारनाथ : उत्तम पटकथेचा अभाव 

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ मधून बॉलीवुड मध्ये आणखी एका स्टार किड्ची एंट्री झाली आहे.सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान या चित्रपटातुन आपल्या पदार्पणाची दखल घ्यायला भाग पाडते. चित्रपटाचा विषय चांगला आहे, मात्र उत्तम पटकथेचा अभाव जाणवतो.

‘केदारनाथ’ ही 2013 च्या  प्रलयाभोवती फिरणारी प्रेमकथा आहे. केदारनाथ मंदिराच्या एका पुजाऱ्याची मुलगी मंदाकिनी उर्फ मुक्कू (सारा अली खान ), पर्यटकांना सफर घडवणाऱ्या मंसूर खान (सुशांतसिंह राजपूत) च्या प्रेमात पडते. मंसूर हा मुस्लिम तरूण उपजिविकेसाठी केदारनाथमध्ये पिठ्ठचेू (पर्यटकांना पाठीवर वाहून नेणारा) काम करत असतो. तर काहीशी हट्टी, बंडखोर मुक्कू आपल्या वडिलांचे दुकान आणि त्यांचे काम सांभाळत असते. तिचे वडिल (नितीश भारद्वाज) केदारनाथमध्ये आपले दुकान सांभाळून पुजाऱ्याचे काम करत असतात. चुलबुली मुक्कू आणि शांत, नम्र मंसूर यांचे प्रेम केदारनाथच्या सुंदर निसर्गात हळूवारपणे फुलते. मात्र, नेहमीप्रमाणे त्यांच्या या प्रेमात त्यांचा धर्म आडवा येतो. मुक्कूचा विवाह तिच्याच धर्मात केला जातो. मात्र, याचवेळी केदारनाथ महाप्रलय घडतो. अन, मग ज्याप्रमाणे प्रचंड वेगाने आलेले  पाणी आपली वाट काढत सर्वकाही नष्ट करत पुढे निघून जाते, तशीच ही प्रेमकथाही पुढे सरकते, मक्कू आणि मंसूर च्या नात्याचे पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ‘केदारनाथ’ बघायला हवा.

महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवरउभा केलेला ‘केदारनाथ’ एक संवेदनशील चित्रपट आहे. ग्लोबल वॉर्मिंग, वाढत्या प्रदूषणाचे धोके, हिंदू-मुस्लिम समाजाचे एक नाजूक नाते, या नात्याचा राजकीय प्रभाव आणि या सगळयात एक नि:स्वार्थ प्रेमकथा हे सगळे धागे दिग्दर्शक अभिषेक कपूरने एकमेकांत गुंफले आहेत. मात्र, या सर्वांची मोट बांधण्यात अपेक्षित यश आले नाही. चित्रपटाच्या पटकथेवर आणखी काम होणे अपेक्षित होते. तुषार कांती राय यांनी केलेली चित्रपटाची सिनेमॅटोग्राफीही विशेष नमुद करण्यासारखी आहे. सिनेमॅटोग्राफीच्या तोडीस तोड कथा फुलली असती तर चित्रपट अधिक यशस्वी ठरली असती.

केदारनाथ महाप्रलय पुढील अनेक वर्षे लक्षात राहणारा आहे. या प्रलयाचे महाभयंकर रौद्र रुप, त्याच्या झळा बसलेले लोक आणि बातम्यांतून हा प्रलय अनुभवलेले भारतीय यांना चित्रपटात हा थरार पुन्हा अनुभवायला येतो. पाण्यातील दृष्य खूपच सुंदर चित्रीत झाले आहेत. पण चित्रपटातील प्रेमकहाणी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करू शकत नाही. प्रेमातील गहिरेपणा दिसत नाही. दिग्दर्शकाचे कौशल्य कमी पडले असे वाटते. 70 हजारांहून अधिक कुटूंबांना उध्वस्त करणारा अन् हजारोंचे आयुष्य पुर्णपणे पालटून टाकणारा हा प्रलय चित्रपटाला रसिकांपर्यंत पोहचतच नाहीत. हिंदू आणि मुस्लिम हा प्रेमकथेचा धागा आहे. हा विषय यापुर्वी अनेकदा आल्याने पुढे काय होणार याची कल्पना प्रेक्षकांना येते, परिणामी प्रेक्षक कथेशी एकरूप होत नाहीत.

कलकरांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर सारा अली खानने पर्दापणातील अभिनयात चुणूक दाखवल्याने प्रेक्षकांना आगामी काळात एक संवेदनशिल आणि दमदार अभिनेत्री मिळणार अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. सुशांतसिंह राजपूतनेही मंसूर  व्यक्तिरेखेला न्याय देणारा अभिनय अचूक केला आहे. इतर कलकरांच्या भूमिका चांगल्या झाल्या आहेत.

केदारनाथ चित्रपटातील गाणी चांगली झाली आहेत. तर पार्श्वसंगीतही लक्ष वेधुन घेते. थोडक्यात सांगायचे तर  मानवी स्वभाव आणि निसर्ग या दोन्ही शक्तीचा स्वार्थ, परमार्थ व क्रोध याचे अनेक पैलू चित्रपट उलगडून दाखवतो यामुळे एकदा बघायला हरकत नाही.

चित्रपट – केदारनाथ

निर्मिती – रॉनी स्क्रूवाला

दिग्दर्शक – अभिषेक कपूर

संगीत – अमित त्रिवेदी

कलाकार – सारा अली खान, सुशांतसिंह राजपूत, नितीश भारद्वाज, अलका आमिन, सोनाली सचदेव, निशांत दहिया आणि पूजा गौर

रेटिंग – 2.5

भूपाल पंडित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)