#MovieReview: ‘तुंबाड’ एक विलक्षण अनुभूती

बॉलीवुड मध्ये सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या, आशयाच्या चित्रपटांची चलती आहे. राही अनिल  बर्वे दिग्दर्शित ‘ तुंबाड’  सुद्धा असाच एक हटके  हॉरर चित्रपट आहे. आपण ऐकलेल्या,  वाचलेल्या काल्पनिक दंतकथा  मधील गूढ़ नेहमीच आपले लक्ष वेेधुन घेत एक अनुभूति देते, तीच अनुभूति  ‘ तुंबाड’ मधून आपल्याला मिळते.

पुण्या जवळच्या  ‘तुंबाड’ नावाच्या गावात राहणाऱ्या ब्राह्मण कुटुंबाची ही कथा. सदाशिव ,त्याचा मोठा भाऊ विनायक (सोहम शहा) आणि विधवा आई (ज्योती मालशे) असे हे कुटुंब आहे. विनायकने सृष्टीच्या जन्माची एक कथा ऐकलेली असते. त्यानुसार, सृष्टीदेवीच्या गर्भातून 16 कोटी देवी-देवता जन्म घेतला. पण देवीचा पहिला पुत्र हस्तर प्रचंड लोभी असतो. त्याला सगळे काही मिळवायचे असते.  दाग-दागिने हडपल्यानंतर हस्तर अन्न चोरायला जातो. त्याची ती लोभी वृत्ती बघून  देव-देवता क्रोधित होऊन त्याला मारायला जातात. पण त्याची जन्मदात्री  देवी त्याला वाचवते आणि आपल्या गर्भात लपवते. याच  गावातील सावकाराच्या वाड्यात एक खजिनाही असल्याचे विनायकला समजते, त्याच्या आईला मात्र खजिना आपल्याला नको असे वाटते, ती गाव सोडून पुण्याला जाते.

-Ads-

काही वर्षां नंतर विनायक खजान्याच्या लालसेने तुंबाडला परत येतो. त्याला खजिना सापडतो का? हस्तर नेमका कोण आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ‘तुंबाड’ बघायला हवा.राही अनिल बर्वे याचे दिग्दर्शन जबरदस्त आहे. अगदी पहिल्या दृश्यापासूनच हा चित्रपट पकड घेतो. पौराणिक आणि स्वातंत्र्यपूर्व असे दोन्ही काळ इतके चोख उभे राहिले आहेत की, त्यात काहीच कसर काढता येत नाही. या चित्रपटाची कथा – पटकथा ही आणखी एक उजवी बाजू. काल्पनिकता, मानवी मन आणि मनाचे व्यापार, काळ आणि काळात घडत जाणारे फरक, भय, करमणूक, संदेश या सगळ्यांचा बारकाईने विचार यामध्ये करण्यात आला आहे. मनाचा थरकाप उडवणारा, भान हरपून टाकणारा आणि त्याच वेळी मानवी मनाच्या संवेदनांची जाणीव देणारा हा चित्रपट म्हणजे  लिखाण, दिग्दर्शन,  अभिनय,  संगीत आणि  छायांकन या सगळ्यांचा जमून आलेला उत्तम मेळ आहे.

कलाकारांच्या अभिनया बद्दल सांगायचे तर चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखाही कसदार आहे. अभिनेता सोहम शाह यांनी साकारलेली विनायक ही व्यक्तिरेखा आपल्या मनात घर करते. त्याशिवाय अनिता दाते, ज्योती मालशे,  मोहम्मद समद यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. याशिवाय पाऊस, काळोख, वाडा, झाड या गोष्टी  जिवंतपणे या चित्रपटात वावरतात.

हॉररपट म्हटल्यावर आपल्या मनात एक चित्र निर्माण होतं. अक्राळविक्राळ चेहरे किंवा तशाच काही करामती, पण उत्तम हॉररपट तोच जो या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकाचं मन काबीज करू शकतो, त्या मनावर आपली गच्च पकड ठेवू शकतो आणि हा चित्रपट त्यात यशस्वी ठरतो. सर्व बाबीमध्ये उत्कृष्ट असलेल्या या ‘तुंबाड’ची तुलना तुम्ही हॉलीवुडपटाशी करू शकता. कारण आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हीएफएक्स, पापणीही लवायला न लावणारं छायांकन आणि त्याला उठाव देणारी अजय – अतुलच्या संगीताची जोड जबरदस्त आहे.

‘तुंबाड’ बद्दल थोडक्यात सांगायचे तर हा चित्रपट केवळ मनोरंजन करत नाही,  त्यापलीकडेही प्रचंड आहे. तुम्ही हॉररपटाचे चाहते असाल तर ही विलक्षण अनुभूति देणारी मेजवानी तुमच्यासाठीच आहे.  तसे नसाल तरी टिपिकल बॉलीवुडपटा पेक्षा वेगळा असलेला ‘तुंबाड’ एकदा आवर्जून बघावा असा आहे.

चित्रपट – तुंबाड
निर्मिती –  सोहम शाह, आनंद के. लाल, मुकेश शाह, 
दिग्दर्शक – राही अनिल बर्वे,
संगीत – अजय-अतुल, जेस्पर
कलाकार –  सोहम शाह, रंजिनी चक्रवर्ती, हरीश खन्ना, दीपक दामले, अनिता दाते, मोहम्मद समद, ज्योती मालशे

– भूपाल पंडित 
pbhupal358@gmail.com

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)