MovieReview : ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ – एक चित्तथरारक अनुभव

दोन वर्षा पूर्वी भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून  ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. याच घटनेवर दिग्दर्शक आदित्य धर याने ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकला आहे. अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला हा युद्धपट ‘ये नया हिंदोस्तान है.. ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी…’ अशा संवादातून चित्रपट नेमका  कसा आहे याची कल्पना देतो.

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’  हा चित्रपट मेजर विहान शेरगील (विकी कौशल) च्या भोवती गुंफण्यात आला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताची मणिपूर कार्यवाही यशस्वी होते. मेजर विहान हा त्याच्या शौर्यासाठी ओळखला जात असतो. मात्र त्यानंतर काही खाजगी कारणामुळे विहान निवृत्तीचा अर्ज करतो. मात्र त्याचं शौर्य पाहून सरकार त्याला दिल्लीत आर्मी बेसमध्ये काम करण्यास सांगते. दरम्यान मणिपूर, पंजाब आणि उरी इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार सर्जिकल स्ट्राइकचा निर्णय घेते. उरी हल्ल्यात विहान त्याचा सर्वात जवळचा मित्र आणि बहिणीच्या नवऱ्याला गमावतो.  सरकार जेंव्हा सर्जिकल स्ट्राईची  तयारी करते तेंव्हा त्याच्या नेतृत्वाची जबाबदारी मेजर विहान शेरगिल स्वःतहून स्वीकारतो आणि एकाही सैन्याच्या बलिदाना शिवाय हे मिशन पूर्ण करण्याचे वचन देतो.  भारतीय सैन्यदलाने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचं चित्तथरारक चित्रण या चित्रपटात आहे,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिग्दर्शक आदित्य धार याने चित्रपटात काहीशी भावनिक बाजू वापरत ती एका महत्त्वाच्या घटनेशी जोडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या खऱ्या ध्वनिचित्रफीती आणि वृत्त वाहिन्यांचे व्हिडिओ वापरत ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ आणखी जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सैन्याच्या एका कारवाईसाठीचा बेत नेमका कसा आणि किती लक्षपूर्वकपणे आखला जातो ही बाब चित्रपटात वारंवार अधोरेखित करण्यात आली आहे.  चित्रपट पूर्णपणे शत्रूच्या हल्ल्याचा बदला घेण्यावरच आधारित असल्यामुळे त्यातील संवाद लेखन तशाच पद्धतीने करण्यात आले आहे. सळसळणाऱ्या रक्तात वाहणारा देशाभिमान चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात विविध रुपांमध्ये पाहायला मिळतो. तसेच राजकीय नजरेतूनही चित्रपटात काही ‘महत्त्वाच्या’ व्यक्ती, त्यांच्या भूमिका या लक्षपूर्वकपणे हाताळण्यात आल्या आहेत.

चित्रपटात कलाकारांचा अभिनय  ही सर्वात जमेची बाजू आहे असे म्हटले  तर वावगे ठरणार नाही, अभिनेता विकी कौशल एक सैन्यदल अधिकारी म्हणून आपल्या मनाला भावतो. त्याने साकारलेली विहान शेरगिल या धाडसी अधिकाऱ्याची भूमिका अक्षरशः तो जगाला आहे. देशासाठी लढणारा जवान आणि आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने रडणारा कणखर सैन्यदल अधिकारी,  कुटुंब आणि देश या दोन गोष्टींनाच सर्वस्वी महत्त्व देणाऱ्या विहानच्या मनाची होणारी घुसमटही लक्ष वेधते. अभिनेता मोहित रैना करणच्या भूमिकेत  प्रभावी वाटतो. यामी गौतमला फार छोटी भूमिका आहे. यामीची सिनेमातील एण्ट्री फार आश्वासक वाटते. मात्र तिची भूमिका अजून खुलवता येऊ शकली असती. तसंच अभिनेत्री कीर्ती कुल्हारीची भूमिका अगदी छोटेखानी आहे. मात्र या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. जिकडे कथा संथ वाटते तिकडे कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने ती उणीव भरून काढली आहे.

चित्रपटाचा पूर्वार्ध संथ वाटत असला तरी उत्तरार्ध तुम्हाला खुर्चीला खिळवून ठेवतो. पाकिस्तानी राजकारण, स्थानिक संघटना, सुरक्षा यंत्रणा यांच्यामध्ये भारतीय सैन्याविषयी होणाऱ्या चर्चा आणि एकंदर वातावरण पाहता पुन्हा एकदा काही घडून गेलेल्या घटना विचारात येतात. थोडक्यात सांगायचे तर सर्जिकल स्ट्राईक नेमके कसे झाले हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हरकत नाही.

चित्रपट – उरी – द सर्जिकल स्ट्राईक

निर्माता – रॉनी स्क्रूवाला

दिग्दर्शक –  आदित्य धर

संगीत – शाश्वत सचदेव

कलाकार –  विकी कौशल, मोहित रैना, यामी गौतम, परेश रावल

रेटिंग – ***

-भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)