Movie Review : नावाप्रमाणे ‘झिरो’

बॉलीवूड मध्ये हिरोला मोठे महत्व आहे, हिरो कोण आहे यावर चित्रपटाचे बरेच गणित अवलंबून असते, असे असले तरी काही दिग्दर्शक या हिरोझमवर मात करत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करतात आणि प्रेक्षक त्या दिग्दर्शकाचा चित्रपट पाहायला जातात. बॉलीवूड बादशहा शाहरूख खानच्या मागील काही चित्रपटांची अवस्था बघता त्याच्या ‘झिरो’ कडून काही अपेक्षा ठेवणे चुकीचेच होते. पण तरीही दिग्दर्शक आनंद एल. राय असल्याने चित्रपटात काहीतरी वेगळे बघायला मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल अर्थात ‘झिरो’चं ठरली असेच म्हणावे लागेल.

‘झिरो’ ही कथा उत्तरप्रदेश मधील मेरठ येथील एका बुटक्या व्यक्ती भोवती गुंफण्यात आली आहे.  बऊआ सिंग ( शाहरुख खान) एक अडतीस वर्षांचा श्रीमंत घरातील, बुटका, वय वाढलेला आणि उंचीमुळे लग्न न होऊ शकलेला मुलगा आहे. एकीकडे तो लग्नासाठी मुलगी शोधत असतो आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री बबीता कुमारी (कॅटरिना कैफ) त्याला खूप आवडते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका विवाह संस्थेत नाव नोंदवल्यावर अपंग, व्हिलचेअर असणाऱ्या आफिया (अनुष्का शर्मा)शी त्याची ओळख होते. ती अपंग असली तरी जगप्रसिद्ध अंतराळ वैज्ञानिक असते. मग ते भेटतात. दोघांमधले शारीरिक दोष वगळता ते एकमेकांच्या प्रेमात कधी पडतात, कसे पडतात आणि का पडतात? हे काही कळत नाही. मग त्यांचं लग्न कसं ठरतं आणि बबिता कुमारीची एन्ट्री बऊआच्या आयुष्यात होते. पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर चित्रपटात आहे.

आनंद एल. राय सारखा दिग्दर्शाक आणि ट्रेलमुळे वाढलेली उत्सुकता हा चित्रपट पाहण्याबद्दल असते तितकाच भ्रमनिरास चित्रपट पाहिल्यावर होतो. शारीरिक व्यंग घेऊन जन्मलेल्या या बऊआकडे चक्क आकाशातले तारे पाडण्याची अनोखी जादूही आहे. चित्रपटाचा मूळ विषय वेगळा वाटत असला तरी पटकथा भरकटली आहे, त्याला ना कुठचा आगा ना पिछा. फक्त प्रत्येक फ्रेममध्ये शाहरुख खान दिसेल याची काळजी घेतली गेली आहे’. संवाद विनोदी करायचे प्रयत्न केले आहेत, पण त्या विनोदांवर जराही हसू येत नाही. कथेच्या उत्तरार्धातील प्रवास अनाकलनीय आहे.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर अनुष्का शर्माने या चित्रपटात निभावलेली आफिया ही व्यक्तीरेखा  तिची आतापर्यंतची सर्वात अवघड भूमिका आहे. ही भूमिका तिने तितक्याच लीलया पेलली आहे. कॅटरिना कैफने मद्याच्या धुंदीत असणाऱ्या, प्रेमभंग झालेल्या एका अभिनेत्रीची भूमिका साकारण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. बुटक्या व्यक्तीच्या रूपात किंग खानला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी हा चित्रपट एकदा पहावा असा आहे. त्याच्या कारकिर्दीत लक्षात राहील अशी भूमिका शाहरूखने वठवली आहे, हे निश्चित. आर. माधवन, अभय देओल आणि इतर सहकलाकारांच्या भूमिकाही उत्तम झाल्या आहेत. चित्रपटात श्रीदेवीसह काही अभिनेत्री कॅमियो आहे.

या चित्रपटाचे संगीत, गाणी लोकप्रिय झाली आहेत. अजय-अतुल जोडगोळीने संगीतबद्ध केलेले ‘जब तक मेरे नाम तू’  हे गाणे पडद्यावर पाहताना आपण त्या गाण्यात हरवून जातो. चित्रपटाच्या तंत्रज्ञानावर अतिशय मेहनत घेतली आहे. हॉलिवूडच्या स्तरावरील वीएफएक्स, सिनेमॅटोग्राफी, सेटअप आणि ग्राफिक्स या सर्वांनी चित्रपटात कमाल आणली आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘झिरी’ मध्ये सर्व गोष्टी  असल्या तरी दमदार कथानका अभावी हा चित्रपट नावाप्रमाणे ‘झिरो’ आहे.

चित्रपट – झिरो
निर्माती – गौरी खान
दिग्दर्शक – आनंद एल. राय
संगीत – अजय – अतुल, तनिष्क बागची
कलाकार – शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरीना कैफ
रेटिंग – **
-भूपाल पंडित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)