निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

शहरात आठ ठिकाणी सादर केली प्रात्यक्षिके

कराड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या कराड शहरात दत्त चौकात पोलिसांकडून संचलनासह प्रात्यक्षिके करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत दहशत पसरविरणाऱ्यांना चाप बसावा तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळांची परिस्थिती निर्माण न होता निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवारी पोलिसांनी शहरात आठ ठिकाणी संचलनाद्वारे प्रात्यक्षिके सादर केली.

या संचलनादरम्यान पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी निवडणूक काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता नागरिकांनी निर्भय वातावरणात मतदान करावे. सध्या आचारसंहिता असल्याने जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री जमाव जमवून गोंधळ माजवू नये तसे आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना ढवळे यांनी यावेळी दिल्या. दरम्यान तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अति संवेदनशील असणाऱ्या महत्त्वांच्या गावांमध्येही तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने संचलन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक ढवळे यांनी दिली. गुरूवारी कोपर्डे हवेली, ता. कराड येथे संचलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

शहर पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरूवात झाली. शाहू चौक, दत्त चौक परिसरात आल्यानंतर आरएसपी तसेच दंगा काबू पथकाच्या जवानांनी प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर आझाद चौक, चावडी चौक, दर्गा मोहल्ला, कन्याशाळा, जोतिबा मंदिर, कृष्णा नाका येथेही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तालुका पोलीस ठाण्याचे अशोकराव क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जोतिराम पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्निल लोखंडे, निर्भया पथकाच्या रूपाली चव्हाण, रेखा देशपांडे, वाहतूक शाखेचे प्रमुख संभाजी गायकवाड यांच्यासह एकूण शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)