आजी-माजी आमदारांच्या घरापुढे आंदोलन

रक्कम लवकरच देणार

माजी मंत्री बबनराव पाचपुते हे 2014 पासून, साईकृपा शुगर अँड अलाईड लि. या कारखान्याच्या कोणत्याही पदावर नाहीत. त्यामुळे त्यांच्या माऊली निवासस्थानी आंदोलन करणे योग्य नाही, असे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे. थकीत रक्कम लवकरच देणार असल्याचे कारखान्याने तहसीलदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

श्रीगोंदा – कुकडी सहकारी व साईकृपा साखर करखान्यांकडे शेतकऱ्यांचे असलेले पैसे मिळावेत, यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते व विद्यमान आमदार राहुल जगताप यांच्या अनुक्रमे ‘माऊली’ व ‘सावली’ बंगल्यांपुढे शेतकऱ्यांची चूल पेटवत संभाजी ब्रिगेडने अनोख्या आंदोलनास सुरवात केली आहे. जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास आज सुरवात झाली.

तालुक्‍यातील कुकडी व साईकृपा (हिरडगाव) या दोन्ही साखर कारखान्यांकडे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड तसेच अन्य तालुक्‍यांतील अनेक शेतकऱ्यांची बिले थकीत आहेत. या बिलांसाठी संभाजी ब्रिगेडने पाचपुते यांचे माऊली व आ. जगताप यांच्या सावली बंगल्यासमोर आज बेमुदत ठिय्या आणि चूल पेटवून आंदोलन सुरू केले.

शहरात दोन्ही आजी-माजी आमदारांच्या घरासमोरील हे आंदोलन चर्चेचा विषय झाले आहे. आंदोलनस्थळावरून बोलताना भोस म्हणाले, दुष्काळ व नापिकी यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने विद्यार्थी, शेतीसाठी व दैनंदिन खर्चासाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज आहे. दोन्ही कारखान्यांना ऊस दिला. उसाची बिले अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाहीत. ही बिले मिळावीत, यासाठी आंदोलनाला सुरूवात झाली. ज्या दिवशी शेतकऱ्यांची बिले मिळतील, त्याच दिवशी आजी-माजी आमदारांच्या दारापुढून उठू. तो पर्यंत आम्ही राहुटीत मुक्कम करणार आहोत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)