दुर्देवी घटना घेण्यापूर्वीच हालचाल करा

डॉ. भारत पाटणकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन

सातारा – गेल्या 32 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा प्रशासनावरील विश्‍वास उडाला आहे. 16 वर्षांपूर्वी किसन पवार या धरणग्रस्ताने आत्मदहन केले होते. आता त्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची परिस्थिती प्रशासनाने निर्माण केली आहे. आत्मदहनासारखी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी व धरणग्रस्त उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले, एक वर्षांपूर्वी कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर करण्याचे आदेश नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, आत्तापर्यंत केवळ पाटण तालुक्‍याचे संकलन करण्यात आले. ते अद्याप आम्हाला देण्यात आले नाही. जावली व महाबळेश्‍वर तालुक्‍यातील संकलन देखील देण्याचे आश्‍वासन दिले ते अजून पूर्ण करण्यात आले नाही. प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाला आता सीमा राहिली नाही. हे असेच चालणार, अशा प्रकारची फलश्रुती धरग्रस्तांच्या हाती आली आहे. प्रशासनाची संपलेल्या संवदेशनशीलतेमुळे भयवाह परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणग्रस्त गंमत म्हणून आंदोलन करत नाहीत.

निर्माण झालेल्या गरिबीमुळे पर्याय उरला नाही म्हणून हक्कांची लढाई ते लढत आहेत. अशा परिस्थितीत 16 वर्षापुर्वी साताऱ्यात कण्हेर धरणग्रस्त किसन पवार यांनी आत्मदहन करण्याचा मार्ग स्विकारला. त्यामध्ये त्यांचा अंत झाला. आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती प्रशासनाने निर्माण केली आहे. विशेषत: युवकांमध्ये उद्रेकाचे वातावरण आहे. मात्र, श्रमिक मुक्ती दलाचा आंदोलनाचा इतिहास शांततेच्या मार्गाचा आहे. तसा प्रकार आम्ही घडू देणार नाही. मात्र, मुख्यमंत्री व महसूल आणि पुनर्वसन मंत्र्यांनी आदेश देवून देखील अधिकारी जुमानत नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील सात जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. मात्र, अशा प्रकारे आंदोलनकर्त्यांना जुमानायचेच नाही असा प्रकार फक्त सातारा जिल्ह्यात सुरू आहे, असे सांगून डॉ.पाटणकर म्हणाले, येत्या 18 तारखेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्‍वासन देण्यात आले आहे. त्या बैठकीपुर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी संकलन पुर्ण करावे, असे देखील आवाहन डॉ.पाटणकर यांनी केले.

विरोधकांना लोकशाहीची काळजी नाही

दरम्यान, श्रमिक मुक्ती दलाची आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय भूमिका विचारण्यात आली. त्यावर डॉ.पाटणकर यांनी आंदोलनस्थळ हे राजकीय व्यासपिठ नाही. योग्य वेळी भूमिका स्पष्ट केली जाईल. मात्र, सध्या विरोधक लोकशाही बचाव करण्याची भाषा जरी बोलत असले तरी त्यांना जनतेच्या रक्षणार्थ आवश्‍यक लोकशाहीची काळजीच नाही असे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत आहे, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)