आई

मूल होणं हा स्त्रिच्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण. मातृत्वाशिवाय स्त्रिच्या आयुष्याला अर्थ नाही, असेही मानले जाते. एक काळ असा होता की, स्त्रिचे जीवन चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते. कालांतराने स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला. त्या अर्थार्जन करू लागल्या. संसार आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पेलू लागल्या. पूर्वी स्त्रिने आई कधी व्हायचं म्हणजे मुलाला जन्म केव्हा द्यायचा म्हणजे विवाहानंतर किती वर्षांनी वगैरे हे तिला ठरवण्याचा अधिकारच नव्हता. किंबहुना याबाबत तिचे काही मत असेल, हेही विचारात घेतले जात नव्हते.

या परिस्थितीत हळूहळू बदल होत गेला. “आई व्हायचं की नाही’, “व्हायचं तर केव्हा’ हे स्त्री ठरवू लागली. कारण मातृत्व आणि करियर हे दोन्ही तिच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरलं. नोकरी आणि संसार ही कसरत अर्थातच सोपी नाही. मुले लहान असताना नोकरी करणाऱ्या आईला त्यांना फारसा वेळ देता येत नाही. मुले मोठी झाली आपापल्या नोकरी व्यवसायात गुंतली की, त्याच काळात आई नोकरीतून निवृत्त झालेली असते. तिच्याकडे वेळच वेळ असतो. पण तेव्हा मुलांकडे वेळ नसतो. हे चक्र असेच चालू राहाते. मुलं पाळणाघरात ठेवून जाताना आईच्या जीवाची घालमेल होते. पण त्याला इलाज नसतो. म्हणून मुले मोठी झाली की सणासुदीला चारी ठाव स्वयंपाक करावा, असे ठरवायचे तर मुलगा म्हणतो, “आई, माझं काही नक्की नाही जेवायला यायचं.’ मग आई हिरमुसते.

पूर्वी कुटुंबात मुलांची संख्या जास्त असायची. आता बऱ्याच कुटुंबात एक किंवा दोन मुले असतात. स्वतःच्या संसारातून निवृत्त झालेली आई मुलीच्या किंवा मुलांच्या संसारात लुडबूड करते. गोष्टी काही वेळा इतका पराकोटीला जातात की यातून घटस्फोट होतात, असे एका पाहणीत आढळले आहे. तर कधी मुलाने किंवा मुलीने मनाविरुद्ध लग्न ठरवले किंवा केले की त्याच्याशी क्षणार्धात नाते तोडून टाकायचीसुद्धा घाई असते.

आई आजारी असेल, तिच्या बाबतीत काही घडलं असेल तर मुलाला ते न कळवताही जाणवते तसेच आईचेही असते. एखादीला काही कारणाने मूल होऊ शकत नसेल किंवा करिअर करणाऱ्या स्त्रिला मातृत्व हवे असूनही पुरेसा वेळ देता येत नसेल तर सध्या “सरोगसी’ ही सोय उपलब्ध झाली आहे. “सरोगसी’ने होणारी आईसुद्धा आईच असते. आपल्या उदरातून मुलाला जन्म देऊन जन्मदात्री होणारी पण त्याचे पालनपोषण करू न शकणारी अशीही आई असते. एखादी स्त्री आई होण्यासाठी मूल दत्तक घेण्याचा पर्यायही निवडते.

मुले, सुना यांच्याशी पटत नाही म्हणून एकटी राहणारी आई या काळात दिसते. “जन्मभर मीच का म्हणून सगळ्यांशी पटवून घ्यायचं, आता या वयात तरी मला स्वतंत्र राहून माझ्या मनासारखं जगू द्या,’ असं एखादी आई स्पष्टपणे सांगून स्वतःच एकटेपण पेलायला तयार असते. मुलांनीच जबाबदारी झटकली म्हणून उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात व्यतीत करणारी आईही याच काळात दिसते.

– डॉ. नीलम ताटके

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)