मोरपीस

माझी सात वर्षांची लेक म्हणाली, “बघ ना ग मम्मा, मला किनई सूर्याचा रागच येतो’ बापरे! शेजारच्या चिंगी, पिंटूचा राग आला तर ठीक आहे पण एकदम सूर्याचा? मी जरा हललेच. “का ग बयो, एकदम सूर्याचा राग आणि आमच्या मनूच्या नाकावर नसतो का राग?अरे बापरे…’, असं म्हणताच मनुताई भडकल्याच.

“बघ ना ग मम्मा, सूर्य किती तापतो, चटके बसतात, नुसती तहान लागते. त्याला कसं कळत नाही की, मला पार्किंगमध्ये माझ्या मित्र-मैत्रिणीशी खेळायला फक्त उन्हाळाच असतो आणि तो इतकं रखरखीत ऊन आमच्या अंगावर टाकतो की सगळ्यांच्या आया म्हणतात, “उन्हात खेळू नका… जाऊ नका… मग खेळायचं ग कधी?’ मनूच्या बोलण्यात पॉईंट होता…तिला थातूरमातूर गोष्ट सांगून, ती वेळ मी मारून नेली. पण मनु एखाद्या सराईत कार्यकर्त्यासारखी आतून पेटली होती. तिनं चक्क पत्र लिहिलं थेट सूर्यालाच…

“सूर्यकाका नमस्कार, मी मनू… तसं तुम्ही मला ओळखणार नाहीच… पण मी काय सगळं जगच तुम्हाला ओळतं… पण मला काय म्हणायचं काका, तुम्ही इतके रागीट का? सारखी आग ओतता आमच्या शाळेतल्या बाईंसारखी… जरा ऊन कमी पाडा न… मला बाहेर खेळता येत नाही… मी एवढ्या चांगल्या सोसायटीत राहून मला उन्हाचा इतका त्रास होतो तर झोपडीत राहणाऱ्या मुलांना कित्ती त्रास होत असेल? त्यांचं घर तर उन्हातच बांधलं असतं… नको नं त्या मुलांना शिक्षा देऊ… बिच्चारी ती माझ्याएवढी कशी राहत असतील… प्लिज काका, ऐक ना तू माझं! तू जर ऐकलंस ना, तर मी तुला गिफ्ट देईन… एक चॉकलेट! प्रॉमिस!’

मनूनं पत्र मला दाखवलं आणि पोस्टात टाकायचा हट्टच धरला… मला तिचा मनोमन अभिमानही वाटला… मग आम्ही ते पत्र पोस्टात टाकलं…सूर्याचं उत्तर कसं येणार न? म्हणजे पुन्हा तिचा हिरमोड! पण चक्क एक दिवस सूर्याचं पत्र आलं.

“प्रिय मनू, बाळा तुझी कळकळ कळली, डोळ्यात पाणी आलं. बाळा, मी इतका वाईट नाही गं,पण माझा माझ्यावर कंट्रोल नाही गं… एक होऊ शकतं बघ. पृथ्वीवर सगळ्यांनी झाडं लावली ना, तर मी तापायचा कमी होऊ शकतो, बघ जमतंय का? तरी कमी तापायचा मी प्रयत्न करतो…’

पत्र वाचून तिला काय आनंद झाला… म्हणजे गगनात मावत नव्हता… मी मात्र कोड्यात… सूर्याचं पत्र? कसं शक्‍य आहे? मी या कोड्याचं उत्तरच शोधत बसले… पण तिकडे मनुताई कामाला लागल्या होत्या… कलिंगडगडाच्या बिया, खरबुजच्या बिया आणि आंब्याच्या कोयी ती जमा करत होती आणि आणि जमेल तिथे मातीत टाकत होती… की झाडं उगवतील आणि रस्त्यावरची पोरं उन्हातही खेळू शकतील. हल्ली मी रस्त्यावरच्या मुलांचे खेळतानाचे फोटो मोबाईलमध्ये काढते आणि तिला दाखवते… ती खुश होते ; म्हणते, “बघ मम्मा, मी बिया पेरते न म्हणून मुलं बघ कशी खेळायला लागली…’ तिच्या या वक्तव्यावर मी हलकेच हसते… तिला काय माहिती नं की, आई तिच्या कोकराच्या आनंदासाठी कित्ती खोटं बोलते…

– डॉ प्राजक्ता मंगेश कोळपकर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)